Prithviraj Chavan : मतदारसंघ फेररचनेच्या माध्यमातून राज्यांमध्ये राजकीय असमतोल निर्माण करण्याचा प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात 
महाराष्ट्र

Prithviraj Chavan : मतदारसंघ फेररचनेच्या माध्यमातून राज्यांमध्ये राजकीय असमतोल निर्माण करण्याचा प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची फेररचना करून राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व बदलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महिला आरक्षण आजपासून लागू करा, अशी मागणीही त्यांनी केली.

Rakesh Khedekar
  • महिला आरक्षण आजपासून लागू करा

  • लोकसंख्येच्या निकषावर जागांची फेररचना मान्य नाही

  • पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला थेट आव्हान

Prithviraj Chavan : महिला आरक्षणाच्या नावाखाली लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवून आणि लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची फेररचना करून देशातील लोकशाही व्यवस्थेचे राजकीय गणित बदलण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेची अट घालण्याची गरजच काय? महिलांना आरक्षण द्यायचे असेल तर आजपासूनच लागू करा; मात्र, त्याच्या आडून राज्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाशी खेळ करू नका, अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सातारा येथील जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महिला आरक्षण विधेयक, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्र सरकारच्या राजकीय हालचालींवर त्यांनी आक्रमक भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

चव्हाण म्हणाले, विशेष अधिवेशन बोलावण्यापूर्वीच केंद्र सरकारने राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांसह अन्य पक्षांच्या खासदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आमचा संशय आहे. या खासदारांना नेमकी कोणती आश्वासने दिली जात आहेत, हे स्पष्ट झाले पाहिजे. विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने केवळ विधेयकाचा विषय नसून त्यामागे मोठे राजकीय गणित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षणासाठी फेररचनेची अट कशाला?

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करताना चव्हाण म्हणाले, महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही; उलट महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. मात्र, आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लोकसंख्येवर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेची अट जोडणे हा वेगळाच राजकीय हेतू असल्याचे दिसते. महिला आरक्षण आजपासून लागू करा आणि आगामी निवडणुकांमध्ये महिलांना त्याचा लाभ द्या. परंतु, आरक्षणाच्या आडून लोकसभेतील राज्यनिहाय जागांची संख्या बदलण्याचा प्रयत्न करू नका.

लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा का?

ज्या राज्यांनी कुटुंब नियोजन, महिला शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी पुढाकार घेतला, त्यांनाच लोकसंख्या कमी झाल्यामुळे लोकसभेतील जागा गमावण्याची वेळ येणार असेल, तर हा त्या राज्यांवर अन्याय ठरेल. लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यांना त्याची शिक्षा द्यायची का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सध्या लोकसभेच्या 543 जागांपैकी महाराष्ट्राच्या 48, तर उत्तर प्रदेशच्या 80 जागा आहेत. या जागांच्या पुनर्रचनेत राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व आणि संघराज्य व्यवस्थेतील समतोल कायम राहिला पाहिजे. केवळ लोकसंख्येचा निकष लावून राज्यांच्या राजकीय वजनात बदल करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी बजावले.

भारत हिंदू राष्ट्र नव्हे, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक!

देशाच्या घटनात्मक रचनेवर भाष्य करताना चव्हाण यांनी केंद्र सरकारला संविधानाची आठवण करून दिली. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वांवर उभी आहे. भारत हे हिंदू राष्ट्र नसून धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे. संविधानातील मूलभूत मूल्यांना धक्का पोहोचविण्याचा कोणताही प्रयत्न देशाच्या लोकशाहीसाठी घातक ठरेल. त्यामुळे महिला आरक्षणाचा विषय पुढे करून लोकशाही संस्थांच्या रचनेत राजकीय सोयीनुसार बदल करण्याचे प्रयत्न झाले, तर त्याला ठाम विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महिलांना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा देतानाच मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला थेट आव्हान देत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली राज्यांचे प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचा समतोल धोक्यात घालण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा आक्रमक संदेश त्यांनी या पत्रकार परिषदेतून दिला.

Nepal Viral Video: बायबल, येशू ख्रिस्त आणि जागतिक अर्थव्यवस्था! पशुपतिनाथ मंदिरातील साधूचा व्हिडिओ व्हायरल

Nashik Ring Road Land Acquisition : नाशिकच्या रिंगरोडसाठी भूसंपादनाला सुरुवात; पण बांधितांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ: जस्सीचा जलवा! दोन विकेट घेताच श्रीनाथ यांचा विक्रम मोडला, Jasprit Bumrah ने परदेशात रचला इतिहास

India MP Voters Ratio : भारतात एका खासदारामागे 26.3 लाख मतदार; अमेरिकेत 8, तर ब्रिटनमध्ये केवळ 1.08 लाखांची संख्या!, मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेला वेग

Bajaj Dominar 400 चे 2027 मॉडेल दिसले टेस्टिंगदरम्यान! TFT डिस्प्ले, TPMS सह मिळणार नवीन फीचर्स