Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा 
महाराष्ट्र

Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा

शेवगावच्या हक्काचे 3.8 टीएमसी पाणी इतर तालुक्यांकडे वळवू नये, या मागणीसाठी ताजनापूर लिफ्ट सर्वपक्षीय कृती समितीचा जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा. पूर्व भागातील 25 गावांचे तलाव वर्षातून चार वेळा 100 टक्के भरून देण्याची मागणी करण्यात आली.

Rakesh Khedekar
  • कृती समितीचा जिल्हाधिकाऱ्यांवर धडक मोर्चा

  • तलाव वर्षातून चार वेळा 100 टक्के भरण्याची मागणी

  • ग्रामसभांचे ठराव प्रशासनाकडे सुपूर्द

पोपट पिटेकर,अहिल्यानगर

Shevgaon Water Issue : जायकवाडी धरणासाठी शेवगाव तालुक्याने आपल्या 29 सुपीक गावांचा त्याग केला आहे. त्या मोबदल्यात जनसंघर्षातून मिळालेले 3.8 टीएमसी पाणी हा आमचा कायदेशीर आणि नैतिक हक्क आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही इतर तालुक्याकडे वळवू देणार नाही, असा खणखणीत इशारा ताजनापूर लिफ्ट सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी दिला.

​शेवगावच्या हक्काचे पाणी इतरत्र वळवण्याच्या हालचालींविरोधात आणि पूर्व भागातील दुष्काळी 25 गावांतील पाझर तलाव वर्षातून चार वेळा 100 टक्के क्षमतेने भरून मिळावेत या मुख्य मागणीसह सुधारित ताजनापूर टप्पा क्रमांक 1 चे काम पुढील एक वर्षात पूर्ण करणे व या योजनेतुन माळेगाव ने येथील सर्व गाव तलाव, बंधारे, नालाबंडीग भरून मिळणे या प्रमुख मागण्यांसाठी कृती समितीने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत ॲड. काकडे आणि जि.पच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. या निवेदनासोबत पूर्व भागातील 25 गावांच्या ग्रामसभांचे ठरावही जोडण्यात आले आहेत.

निवेदनाच्या प्रती पालकमंत्र्यांना पाठवल्या

​जायकवाडी धरणातील राखीव 3.8 टीएमसी पाण्यातून 17 गावांसाठी ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. 2 (2.267 टीएमसी) चे काम सध्या सुरू आहे. तसेच ॲड. काकडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 जानेवारी 2026 रोजी टप्पा क्र. 12 (1.61 टीएमसी) ला मंजुरी दिली आहे. मात्र, टप्पा क्र. 1 मधील शिल्लक पाण्यातून शेवगावच्या 20 आणि पाथर्डी तालुक्यातील 26 गावांना पाणी देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याला कृती समितीने कडाडून विरोध केला असून, पाथर्डीसाठी शासनाने स्वतंत्र योजना आखावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कार्यकारी अभियंता यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला

​मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन 'आम्हाला पाणी मिळू द्या पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अश्रू पुसा शेतकऱ्यांचे' अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

​या आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे, हर्षदा काकडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, युवा नेते पृथ्वीसिंग काकडे, माजी जि. प. सदस्य प्रकाश भोसले, अशोक ढाकणे, सुनील गायके, विठ्ठलराव तांबे, माणिक गर्जे, प्रमोद तांबे यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कृती समितीच्या खालील 4 प्रमुख मागण्या केल्या.

​1. जायकवाडीतील 3.8 टीएमसी पाणी केवळ शेवगाव तालुक्यासाठीच वापरावे; पाथर्डी तालुक्यातील 26 गावांचा यात समावेश करू नये.

​2. प्रस्तावित ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. 3 मध्ये शेवगावच्या 20 गावांसह अंतरवाली बुद्रूक, अंतरवाली खुर्द, लखमापुरी, सोनविहीर आणि गायकवाड जळगाव या 5 गावांचा समावेश करून 25 गावांचा एकत्रित आराखडा तयार करावा.

​3. पूर्व भागातील जमीन बरड व मुरुमाड असल्याने वर्षातून एकदा 75% तलाव भरणे अयोग्य आहे. तलाव व बंधाऱ्यांतील गाळ काढून खोलीकरण करावे आणि वर्षातून 4 वेळा 100% क्षमतेने पाण्याने भरून मिळावे.

4. सर्वेक्षणासाठी मंजूर 1 कोटी रुपयांच्या निधीतून केवळ शेवगाव तालुक्याचे स्वतंत्र सर्वेक्षण जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करावे.

Colgate Visible White Purple : जाहिरातींऐवजी आता थेट ड्रामा सिरीज! कोलगेट व्हिजिबल व्हाइट पर्पलची ६ भागांची मायक्रो-ड्रामा सिरीज लाँच

Travel: भारतातील ही ८ अनोखी पर्यटनस्थळे एकदा नक्की पहा! निसर्ग, संस्कृती आणि साहसाचा मिळेल अनोखा अनुभव

Israel News : नेतन्याहू यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळण्याची शक्यता; भ्रष्टाचार प्रकरणातील गंभीर आरोप मागे घेण्याची न्यायाधीशांची शिफारस

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये 'केळवण'चा जल्लोष? वधूसाठी महिलांनी केला अनोखा सोहळा

Washim: पाणीटंचाईच्या संकटाआधीच प्रशासनाचा प्लॅन तयार! जलस्रोतांची तत्काळ पडताळणी करण्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरांचे निर्देश