Washim Karanja Rabi Season Crisis  Washim Karanja Rabi Season Crisis
वाशिम

Washim News: दुष्काळाचा रब्बी हंगामालाही फटका! कारंजात अवघ्या ३६८ हेक्टरवर पेरणी; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Washim Karanja Rabi Season Crisis due to Water Scarcity : खरीप उत्पादनात घट झाल्यानंतर आता कारंजा तालुक्यात रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. पाण्याअभावी अवघ्या ३६८.१ हेक्टरवर पेरणी झाली असून, अनेक गावांत पेरणी निरंक आहे.

Priyanka Mundinkeri
  • पाण्याअभावी रब्बी हंगाम धोक्यात

  • कारंजा तालुक्यात रब्बी पेरणीची स्थिती चिंताजनक

  • अनेक गावांत क्षेत्र निरंक

कारंजा: खरीप हंगामात पावसाने दिलेली दडी आणि पिकांच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामाचेही संकट उभे ठाकले आहे. जमिनीतील ओलावा कमी आणि सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अनिश्चित असल्याने कारंजा तालुक्यात रब्बी पेरणीचा वेग मंदावला आहे.

तालुक्यात आतापर्यंत अवघ्या ३६८.१ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली असून, अनेक गावांमध्ये पेरणीचे क्षेत्र अद्याप निरंक आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या तुलनेत कारंजा तालुक्यात रब्बी पेरणीची स्थिती सर्वाधिक चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिला. पेरणीच्या काळात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला, तर पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने मोठा खंड दिला. परिणामी, सोयाबीन, कपाशी, तूर यांसह विविध खरीप पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. खरीप हंगामात झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

त्यातच खरीप हंगामानंतरही पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. पेरणी, बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर खर्च करूनही पाणी उपलब्ध झाले नाही, तर गुंतवणूक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे उपलब्ध ओलाव्यावर पेरणी करावी की पाणी मिळण्याची प्रतीक्षा करावी, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहेत. अनेकांनी पाण्याअभावी शेतजमिनी पडिक ठेवण्याचा निर्णय घेतला असून, खरीपपाठोपाठ रब्बी हंगामही हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अनिश्चित

रब्बी पिकांच्या वाढीसाठी जमिनीतील ओलावा आणि आवश्यकतेनुसार सिंचनाची सुविधा महत्त्वाची असते. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जलसाठ्यांवरही ताण निर्माण झाला आहे. धरणांमधील उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी सिंचनावर निर्बंध असल्याने धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाणी मिळण्याची खात्री राहिलेली नाही. दुसरीकडे, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट झाल्याने पर्यायी सिंचन व्यवस्थाही अडचणीत आली.

योग्य कालावधी महत्त्वाचा

रब्बी हंगामात हरभरा, गहू, करडई, रब्बी ज्वारी, गळीत धान्य, तृणधान्य आणि मका या पिकांची लागवड केली जाते. त्यात हरभरा हे प्रमुख पीक असून, कमी ओलाव्यातही पेरणी करण्याचा शेतक-यांचा प्रयत्न असतो. मात्र, पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी जमिनीत ओलावा टिकून राहणे आवश्यक आहे. गहू आणि मका यांसारख्या पिकांना तुलनेने अधिक पाण्याची गरज असल्याने सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतक-यांसमोर अडचणी आहेत.

करडई आणि रब्बी ज्वारीसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकाकडे काही शेतकऱ्यांचा कल असला, तरी जमिनीतील ओलावा आणि पुढील पावसाची शक्यता लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन केले जात आहे. रब्बी पेरणीचा योग्य कालावधी महत्त्वाचा असताना पाण्याअभावी पेरणीला विलंब होत आहे. त्यामुळे उशिरा पेरणी झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे.

उत्पन्नाची आशाही धूसर

खरीप हंगामातील खर्च, उत्पादनातील घट, शेतीमालाचे अस्थिर दर आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत, रब्बी हंगामातून काही उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असताना पेरणीचे क्षेत्रच आक्रसल्याने आर्थिक संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.

रब्बी पेरणी कमी झाल्यास शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थिती, सिंचनाच्या मर्यादित सुविधा आणि पाण्याची अनिश्चितता यामुळे कारंजा तालुक्यात यंदा रब्बी हंगाम संकटाच्या छायेत सापडला.

म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेची जय्यत तयारी; मंत्री जयकुमार गोरेंच्या आदेशानंतर प्रशासन कामाला

IND Vs SL A: शर्मा अन् वर्माने उद्ध्वस्त केली लंकेची गोलंदाजी; विजयासाठी ठेवले 318 रन्सचे टार्गेट

'सरकारी योजनांची माहिती घराघरांत पोहोचवणार,' भाजपच्या सेवा दूत अभियानाची तयारी सुरू रविंद्र चव्हाण ॲक्शन मोडमध्ये!

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळली; एकाचा मृत्यू, ४ जखमी

Terracotta Jewellery: टेराकोटा ज्वेलरीचा वाढतोय ट्रेंड, मातीच्या दागिन्यांनी महिलांना घातली भुरळ!