महिंद्रा कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांच्या ‘फ्रीडम एनयू’ कार्यक्रमादरम्यान ‘एनयू_आयक्यू’ या नव्या मॉड्युलर मोनोकॉक प्लॅटफॉर्मवर आधारित चार संकल्पना (कॉन्सेप्ट्स) सादर केल्या होत्या. यामध्ये व्हिजन एस, व्हिजन टी, व्हिजन एक्स आणि व्हिजन एसएक्सटीचा समावेश होता. सध्या व्हिजन एस कारची रस्त्यांवर चाचणी सुरू असतानाच, आता ‘व्हिजन एसएक्सटी’च्या डिझाईन पेटंटचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. यामुळे महिंद्रा याच प्लॅटफॉर्मवर एक विशेष ऑफ-रोड एसयूव्ही आणण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, जी दिसायला ‘बेबी स्कॉर्पिओ-एन’सारखी असू शकते.
पेटंटमधील डिझाईन
पेटंटमधील डिझाईन पाहिल्यास हे मॉडेल मूळ संकल्पनेशी बरेच मिळतेजुळते आहे. कारच्या समोरील भागात उभी रचना, उभ्या पट्ट्यांचे आयताकृती ग्रिल आणि कोपऱ्यात वरच्या बाजूला स्लीक हेडलाइट्स देण्यात आले आहेत. कारचे बॉनेट सपाट असून पुढील बंपर मजबूत आणि स्किड प्लेटसह येतो, जो या कारला उत्तम ऑफ-रोडिंग क्षमता देतो.
Mahindra News: महिंद्राची मोठी तयारी! येत्या काही महिन्यांत लॉन्च होणार ३ नवीन दमदार एसयूव्ही
गाडीचे स्ट्रक्चर
गाडीच्या बाजूच्या रचनेचा (प्रोफाइल) विचार केल्यास, यात चौकोनी व्हील आर्चेस, मोठे ऑल-टेरेन टायर्स, सपाट छताची रेषा आणि उत्तम ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. तसेच, संरक्षणासाठी जाड ट्युब्युलर बार आणि चढण्यासाठी मजबूत साईड स्टेप्स देण्यात आल्या आहेत. मूळ संकल्पनेत मागे दोन सुटे टायर्स (स्पेयर व्हील्स) दाखवले होते, परंतु पेटंटमध्ये उत्पादनासाठी सोयीस्कर असा एकच टायर मागे लावलेला दिसतोय.
भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ५ ‘लेजंडरी’ महिंद्रा कार! एका क्लिकवर पाहून घ्या
गाडीची खासियत
महिंद्राचा हा ‘एनयू_आयक्यू’ प्लॅटफॉर्म अतिशय लवचिक असून तो पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनसाठी विकसित करण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट-व्हील, रिअर-व्हील आणि ऑल-व्हील ड्राईव्हचे पर्याय उपलब्ध असतील. जर महिंद्राने व्हिजन एसएक्सटी मॉडेल बाजारात आणले, तर ती प्रामुख्याने ऑफ-रोडिंगची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी एक शक्तिशाली फोर-बाय-फोर एसयूव्ही ठरेल.






