छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती! 'JSW Motors' या दिवाळीत सुरू करणार प्रत्यक्ष उत्पादन (Photo Credit- X)
मागील दोन वर्षांत छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक हालचालींना कमालीचा वेग आला आहे. ऑरिक सिटी (AURIC City) आणि बिडकीन परिसरात एथर (Ather Energy), पिरामल फार्मा (Piramal Pharma) आणि टोयोटा किर्लोस्कर (Toyota Kirloskar) यांसारख्या अनेक बड्या जागतिक कंपन्यांनी आपल्या भव्य प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. यामध्ये आता इव्ही (EV) कार निर्मिती क्षेत्रात उतरलेल्या ‘जेएसडब्ल्यू’ची भर पडल्याने शहराचे नाव ऑटोमोबाईल हब म्हणून जागतिक नकाशावर झळकणार आहे.
कंपनीने व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने आपल्या कामाला मोठी गती दिली आहे. बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल ५५० एकर विस्तीर्ण जागेवर जेएसडब्ल्यू आपला भव्य मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारत आहे. या प्लांटच्या उभारणीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार, जेएसडब्ल्यूने चीनमधील नामांकित ‘चेरी’ (Chery) कंपनीसोबत मोठी भागीदारी केली आहे. त्यांच्या सहकार्याने संभाजीनगरच्या या प्लांटमध्ये कारची असेंब्ली केली जाणार आहे. नोव्हेंबर २०२६ पासून एनईव्ही (New Energy Vehicle – NEV) चे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होईल. या कारसाठी प्रगत चिनी तंत्रज्ञानाचा (Chinese Technology) वापर करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू कंपनीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादित होणारे पहिले मॉडेल ‘जेटूर टि २’ (Jetour T2) असणार आहे. या प्रीमियम कारची किंमत ३५ लाख रुपयांच्या आसपास किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. या दिवाळीत उत्पादन सुरू झाल्यावर, नोव्हेंबरपासून देशभरात याची बुकिंग विंडो उघडेल. हे मॉडेल केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही निर्यात (Export) केले जाणार आहे. या पहिल्या मॉडेलनंतर सामान्य ग्राहकांसाठी कंपनीचे दुसरे मॉडेल अंदाजे १८ ते २० लाख रुपये किमतीचे असू शकते. याशिवाय, आगामी काळात आणखी दोन ते तीन नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतरवण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.
बिडकीन येथील या प्लांटमध्ये आधुनिक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या प्लांटमधून दर तासाला ६० कार बनतील, अशी भक्कम योजना कंपनीने आखली आहे. वर्षाला सुमारे ५ लाख युनिट्सचे उत्पादन करून भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे मार्केट काबीज करण्याचे उद्दिष्ट जेएसडब्ल्यू मोटर्सने ठेवले आहे. यामुळे स्थानिक पातळीवर हजारो तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
पूर्वजांचे पैसे बँक किंवा विम्यात तसेच पडून आहेत? ‘अशी’ ट्रान्सफर करा बँक खात्यात हक्काची रक्कम






