फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांचे पुढील ५० वर्षे उज्ज्वल घडवायची असतील, तर सध्याच्या काळात त्यांना मोबाइलपासून काही काळ दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन व्यक्तिमत्त्व विकासाच्या राष्ट्रीय प्रशिक्षिका नीता मुंधडा यांनी केले. मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील रामबिलास मुंधडा हायस्कूलमध्ये आयोजित शैक्षणिक व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमात शाळेतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
नीता मुंधडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजचा विद्यार्थी प्रचंड माहितीच्या ओघात अडकलेला आहे. मोबाइलमुळे माहिती सहज मिळत असली, तरी त्याचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, एकाग्रतेवर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. सुसंस्कार, शिस्त, वाचनाची सवय आणि प्रत्यक्ष अनुभव यांमधूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमोद मुंधडा यांनी भूषवले. यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी नीळकंठ यावले, केंद्रप्रमुख कल्पना विंचूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर देवेंद्र मुंधडा, प्रफुल्ल मुंधडा, महेश मुंधडा, मनोहर शहाणे, धनराज राठोड, मनोज भारसाके, छाया मुंधडा, शाश्वत मुंधडा, संध्या मुंधडा, सुधाकर धोटे, नरेंद्र बाकडे, रमेश घोडिले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी व पुष्पसजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय संस्थाचालक मंडळाच्या वतीने उत्कृष्ट बँड संचालन, उत्कृष्ट परेड संचालन, दैनिक परिपाठ, साप्ताहिक बातमीपत्र, आदर्श विद्यार्थी, शाळांतर्गत विविध स्पर्धा, विविध विषयांतील गुणवंत विद्यार्थी, डायमंड ज्युबिली विद्यार्थी तसेच डायमंड ज्युबिली स्काऊट दलातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने शाळेतील वातावरण उत्साहाने भारले होते.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिनेश शर्मा यांनी केले. शिष्यवृत्ती वितरणाची जबाबदारी यशवंत सलामे यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी बदुकले यांनी केले, तर आभारप्रदर्शन अतुल पचारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र खैरकर, सीमा गांधी, प्राजक्ता वाटाणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. एकूणच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि नैतिक विकासासाठी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांची गरज असल्याचे या सोहळ्यातून अधोरेखित झाले. गुणवंतांचा गौरव आणि योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून ते भविष्यात जबाबदार नागरिक घडतील, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.






