फोटो सौजन्य - Social Media
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेचा (UP Board) दहावी आणि बारावीचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल 90.42 टक्के तर बारावीचा निकाल 80.32 टक्के लागला आहे. लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून राज्यभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दहावीच्या परीक्षेत कशिश वर्मा आणि अंशिका वर्मा यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे. दोघांनीही 97.83 टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. द्वितीय क्रमांकावर अदिती हिने 97.50 टक्के गुणांसह स्थान मिळवले, तर तृतीय क्रमांकावर अर्पिता हिने 97.33 टक्के गुण मिळवले आहेत. याचबरोबर ऋषभ साहू आणि परी वर्मा यांनाही समान गुण मिळाले असून त्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले आहे.
बारावीच्या निकालात शिखा वर्मा हिने 97.60 टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांकावर नंदिनी गुप्ता आणि श्रिया वर्मा या दोघींनी 97.20 टक्के गुणांसह स्थान मिळवले आहे. तर तृतीय क्रमांकावर सुरभि यादव आणि पूजा पाल यांनी 97 टक्के गुण मिळवत आपली छाप पाडली आहे.
यूपी बोर्डाच्या या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांसाठी एकूण 53 लाख 37 हजार 778 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दहावीचे 27 लाख 61 हजार 696 आणि बारावीचे 25 लाख 76 हजार 82 विद्यार्थी होते. प्रत्यक्ष परीक्षेला बारावीमध्ये सुमारे 26 लाख तर दहावीमध्ये 24.5 लाख विद्यार्थी उपस्थित होते.
मात्र, यंदा काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. दहावीमध्ये 1 लाख 61 हजार 696 आणि बारावीमध्ये 1 लाख 26 हजार 82 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. एकूण 2 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा न दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. गुणवत्तापूर्ण निकालामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळाले असून, पालक आणि शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे. आता यशस्वी विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधी खुल्या झाल्या आहेत.






