फोटो सौजन्य - Social Media
या शिबिरात नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी “Say No To Drugs, Yes To Life” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. “व्यसन सोडा, माणसे जोडा; जीवन सुंदर आहे, व्यसनमुक्त राहा,” या संदेशातून त्यांनी अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे व्यसन, सामाजिक माध्यमांचा परिणाम, अमली पदार्थांचे जाळे आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. समाजात व्यसनमुक्तीचा प्रसार करण्यासाठी युवकांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिबिराच्या वातावरण निर्मिती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम, कुटुंबावर होणारा भावनिक परिणाम आणि आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम याबाबत माहितीपट, गटचर्चा आणि नाटकांच्या माध्यमातून जाणीव करून देण्यात आली. समुपदेशन तज्ज्ञांनी “प्रेशर नसताना व्यसन का वाढते?”, “मानसिक आरोग्य आणि व्यसन”, “तरुणांच्या आयुष्यातील योग्य निवडी” या विषयांवरही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तीकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की, “व्यसनमुक्त पिढी घडवणे ही आजची गरज आहे. युवा पिढीने समाजात सकारात्मकता निर्माण करून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा.” राष्ट्रीय सेवा योजनेचे पालघर जिल्हा समन्वयक डॉ. दिपा दळवी, विभागीय समन्वयक वंदना सिंग, कार्यक्रम अधिकारी गौतम गायकवाड, अॅड. शिवानी सावंत यांचीही उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय सेवा योजनेचे तब्बल १०३ स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून टीमवर्क, नेतृत्वगुण, समाजसेवा आणि सामाजिक जाणीव या मूल्यांचा अनुभव घेतला. शिबिरात आरोग्य जागरूकता, स्वच्छता मोहीम, ग्रामसफाई, वृक्षारोपण आणि संवाद सत्रे घेण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी अंमली पदार्थविरोधी शपथ घेऊन करण्यात आली. “व्यसनमुक्त भारत” घडवण्याच्या दिशेने युवकांनी घेतलेला हा संकल्प प्रशंसनीय असल्याचे आयोजकांनी सांगितले. या शिबिराची माहिती नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य आणि नशाबंदी मंडळ पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी दिली.






