Exclusive Series : बालविवाहातून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिलां-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास (फोटो सौजन्य: युवराज चव्हाण/फैसल)
त्यांच्या जोडीला नानीबाई शिंदे, त्यांच्या ४० वर्षीय आजी बसल्या होत्या. त्या कधीच शाळेत गेल्या नव्हत्या. पण अभ्यासाचं महत्त्वं त्यांना माहित होतं. आपल्या पारधी बोलीभाषेत त्या प्रत्येक मुलाला विचारत होत्या, “आज तुझा अभ्यास काय आहे? शिक्षकांनी आज काय शिकवलं? शाळेत काय केलं?” त्यांची उपस्थिती केवळ या मुलांवर लक्ष ठेवण्याची नव्हती. पण मुलांनी अभ्यास बुडवू नये, त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये ही त्यांचा मुख्य काळजी होती.
पारधी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. वर्षानुवर्षे मजुरी, मेंढीपालन किंवा अंगावर पडेल ते काम करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ब्रिटिश काळात, पारधींना “गुन्हेगार जमात” असा शिक्का लावण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये हा शिक्का अधिकृतपणे रद्द करण्यात आला तरी सामाजिक कलंक आजही कायम आहे. आजही हा समाज मागास जीवन जगतो. वाखरवाडीमध्येही काही परधी कुटुंबं राहतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्यापैकी एकाही मुलगा शाळेत जात नव्हता. गावातील काही लोक आणि नानीबाईंच्या प्रयत्नांमुळे, आज समाजातील प्रत्येक मूल शाळेत जातं. नानीबाईंनी पुढाकार घेतल्याने आज या मुलांना शिक्षण मिळतं. स्वानुभवातून नानीबाईंना माहित होतं की, शिक्षणाशिवाय आपला समाज बालमजुरी, बालविवाह आणि पिढ्यानपिढ्यांच्या गरिबीच्या चक्रातून मुक्त होणार नाही.
“मी माझ्या समाजातील प्रत्येक मुलगी आणि मुलाला शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करते. मी स्वतः पाहिले आहे की, बालविवाह कसा आयुष्य बरबाद करतो. आज, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत, मी अभिमानाने त्यांना सांगितले की आमच्या समाजातील सर्व मुलं आता शाळेत दाखल झाली आहेत,” नानीबाई म्हणाल्या. नानीबाईंचा लहान वयात विवाह झाला होता. त्यांना शाळेत जाण्याची संधीच मिळाली नाही. पण आज त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत आणि याचे श्रेय त्यांच्या गावातील समितीचे अध्यक्ष दीपक भाऊ शिंदे यांना जाते. उदरनिर्वाहासाठी दैनंदिन मजूरी करणाऱ्या नानीबाई आता बालविवाहाविरोधात मोकळेपणाने बोलतात आणि या प्रथेला विरोध करतात. त्या कुटुंबांशी संवाद साधतात, पालकांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी भाग पाडतात. अगदी स्वतः शेजारच्या मुलांनाही शाळेत सोडायला जातात.
महाराष्ट्राच्या दुर्लक्षित अशा मराठवाडा प्रदेशातील वाखरवाडी या गावात, नानीबाई केवळ आपल्या समाजातच नव्हे तर संपूर्ण गावात आदराचा विषय बनल्या आहेत. त्या शाळेत गेल्या नव्हत्या, तरीही त्या शिक्षणाबद्दल दृढनिश्चयी आहेत. “बालविवाह केवळ मुलीच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीला अडथळा आणत नाही, तो मुलगी आणि बाळ यांच्याही आरोग्याला धोकादायक ठरतो. अगदी डॉक्टर देखील लहान वयात लग्न झालेल्या मुलींच्या गर्भारपणाविरोधात सल्ला देतात. माझा स्वतःचा बालविवाह झाला होता. तेव्हा, मला काहीच समजत नव्हते. मी मुलाला जन्म दिला नव्हता म्हणून, माझ्या नवऱ्याने दुसरं लग्नं केलं. माझ्याच कुटुंबात, मी असंख्य मुलींचं बालवयातच लग्न होताना पाहिलं आहे. त्यांच्या आयुष्यात कधीच न संपणारे अनेक गुंतागुंतीचे प्रश्नही निर्माण होतात. मला खूप उशीरा समजले की ही प्रथा चुकीची आहे. आता हे असे बालविवाह कोणाचेही होऊ नयेत म्हणून माझा कायम प्रयत्न असतो. म्हणूनच मी खात्री करते की आमच्या समाजातील प्रत्येक मूल शाळेत जातं की नाही,” त्या म्हणाल्या.
बालविवाह मराठवाड्यात अजूनही सामान्य समजले जातात. सरकारी माहितीनुसार, कोविडच्या काळामध्ये बालविवाहांमध्ये मोठी वाढ झाली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ (२०१९–२१) नुसार, महाराष्ट्रातील मराठवाड्यासह १८ जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण २२% पेक्षा जास्त आहे. याविषयी उघडपणे बोलणे अनेकांना शक्य होत नाही, गावातील काही लोकांचा त्याला पाठिंबा असतो किंवा त्यासाठी संघर्षही होऊ शकतो. पण मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही आयुष्यावर त्याचा कायमस्वरुपी खोल परिणाम होतो.
नानीबाईंचाही प्रवास सोपा नव्हता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर, नानीबाई कुटुंबाच्या एकमेव कमावत्या बनल्या. शिक्षण नाही, कसायला जमीन नाही आणि कोणतेही खास कौशल्यं नसल्याने शेतमजुरी करण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. पण ती कमाईही मूलभूत गरजा भागवण्यासाठी पुरेशी नव्हती. तरीही हार न मानता त्या काम करत राहिल्या.
त्याच दरम्यान, साधारण २०२२–२३ मध्ये, युनिसेफने लिंग समभाव कार्यक्रम धाराशिव जिल्ह्यामध्ये राबवायला सुरुवात केली. अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला.
अनेक गावकऱ्यांसाठी, “लिंग समभाव” सारखे शब्द पूर्णपणे नवीन होते. तरीही त्यांनी ते जाणून घेण्यात उत्सुकता दाखवली, संवाद साधण्याची तयारी दाखवली. गावातील एक प्रमुख व्यक्ती दीपक शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. गरिबीमुळे त्यांनाही शाळा सोडावी लागली होती. शिक्षणाबद्दल त्यांना कायम आस्था होती. त्यामुळे अगदी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शाळेसाठी, मुलांसाठी ते नेहमी काम करत असतात. त्यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दीपक भाऊंनीच नानीबाईंची क्षमता ओळखून, त्यांना शाळा व्यवस्थापन समितीत आणले.
“सुरुवातीला नानीबाईंचा प्रतिसाद नव्हता. कारण शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीला यायचं तर एक दिवसाची मजुरी बुडवावी लागेल. पण एकदा त्या चर्चांमध्ये सामील झाल्या. लिंग समभावविषयी चर्चा त्यांनी ऐकल्या, बालविवाह त्याविषयीचे कायदे याबद्दल त्यांना माहिती मिळाली. मग त्या हळूहळू बोलायला लागल्या. सर्वप्रथम त्यांनी आपल्या समाजातल्या सर्व मुला-मुलींना शाळेत दाखल केलं. मग त्या बालविवाह थांबवण्यासाठी काम करू लागल्या. आज त्या केवळ शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य नाहीत तर ग्रामपंचायतीच्या देखील आदरणीय सदस्य आहेत,” दीपक भाऊ म्हणाले.
युनिसेफ आणि त्यांच्या सहकारी संस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, वाखरवाडी आता बालविवाहमुक्त आहे. इथले प्रत्येक मूल किमान ८ वीपर्यंत शाळेत जाते. महिला केवळ नावाला ग्रामपंचायतीत निवडून येत नाहीत तर प्रत्यक्ष कारभारात सहभागी होतात, त्या आत्मविश्वासाने बोलतात, नेतृत्व करतात आणि निर्णय घेण्याची क्षमताही बाळगतात.
नानीबाईंच्या व्यक्तीमत्वातलं परिवर्तन हे मोठं आहे. थोड्या मदतीमुळे बदल घडू शकतात हे त्यांच्या गोष्टीवरून दिसून येतं. एकूण बालविवाह या हानिकारक प्रथेचा अंत करण्यासाठी नानीबाईंसारख्या अनेक महिला, पुरुष पुढे येणं गरजेचं आहे. ते एकत्र आले तर प्रत्येक मुलगा-मुलगी एक सुरक्षित भविष्य अनुभवू शकेल.
संकलन : युवराज चव्हाण, कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, एमजीएम युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर
छायाचित्र श्रेय: युवराज चव्हाण/फैसल






