फोटो सौजन्य- सोशल मीडिया
School Dropout Rate in India: भारतात आजच्या काळात लाखो मुले अशी आहेत. जी आर्थिक टंचाई, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक समस्यांमुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडतात. यात सर्वात चिंतेची बाब म्हणजे मोठ्या संख्येने मुली शाळा सोडत आहेत. २०२२-२३ ते २०२३-२४ दरम्यान देशभरात लाखो मुलांनी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर शाळा सोडली. यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे परंतु, अनेक राज्यांमध्ये मुलींचे शिक्षण सुटण्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अशा परिस्थितीत पैशांच्या कमतरतेमुळे दरवर्षी किती मुली शिक्षण सोडत आहेत आणि कोणत्या राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे, ते सविस्तर जाणून घेऊया..
या अहवालानुसार, बिहार हे देशात सर्वाधिक ‘ड्रॉपआउट’ (शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण) जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. येथे सुमारे २७ लाखांहून अधिक मुलांनी शाळा सोडली आहे. त्यानंतर राजस्थान ८.९९ लाख विद्यार्थी, उत्तर प्रदेश ७.४१ लाख मुले, आसाम ३.५८ लाख आणि मध्य प्रदेशमध्ये ३.३७ लाख मुलांनी शाळा सोडल्याचे दिसून येते. या राज्यांमध्ये आर्थिक परिस्थिती, ग्रामीण भागातील समस्या आणि शिक्षणाच्या मर्यादित संधी हे घटक शाळा सोडण्याची मुख्य कारणे मानली जातात.
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) च्या एका सर्वेक्षणानुसार, सुमारे ३३ टक्के मुली या घरातील जबाबदारींमुळे शिक्षण सोडत आहेत. तसेच ग्रामीण भागात कमी वयात होणारे लग्न हे देखील मुलींचे शिक्षण थांबवण्याचे एक मोठे कारण मानले जाते.
उत्तर प्रदेशमध्ये इयत्ता ६ ते ८ वीच्या दरम्यान मोठ्या संख्येने मुली शाळा सोडत आहेत. याव्यतिरिक्त, राजस्थान आणि इतर काही राज्यामध्ये मुस्लिम आणि आदिवासी समाजातील मुलींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.






