फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Tribal Students Success Story: योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहत नाही. हे यंदा तामिळनाडूच्या आदिवासी कल्याण विभागाच्या शाळामधील ४८ विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे, ज्यामुळे संपूर्ण तमिळनाडू राज्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
या विद्यार्थ्यांनी भारतातील नामांकित संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट‘ (IITTM) मध्ये परीक्षा उत्तीर्ण करून तेथे प्रवेश मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये १८ विद्यार्थिनींचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांनी या संस्थेपर्यंत पोहोचवण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी केवळ ११ अदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली असून यंदा हा आकडा ४८ वर पोहचल्याने ही गोष्ट खूपच अभिमानास्पद मानली जात आहे.
IITTM ही देशातील पर्यटन आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट क्षेत्रातील सर्वात प्रमुख संस्था मानली जाते. ही संस्था केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. येथे पर्यटन ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी, डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांसारख्या विषायांचे उच्च शिक्षण दिले जाते.
निवड झालेले विद्यार्थी उत्तर प्रदेशातील नोएडा कॅम्पसमध्ये तीन वर्षांचा ‘बीबीए इन टूरिझम अँड ट्रॅव्हल’(BBA in Tourism & Travel) हा कोर्स पूर्ण करणार आहेत. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च तामिळनाडू सरकार उचलणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कुमकुवत कुटुंबातील मुलांनाही उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी मिळाणार आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आदिवासी भागातील मुलांना देशातील एवढ्या मोठ्या संस्थेत पाठवण्यास पालकांचा विरोध होता. पालकांना त्यांच्या मुलांची सुरक्षा, राहण्याची सोय किंवा नवीन वातावरणाबद्दल काळजी वाटत होती. त्यामुळे अनेक हुशार मुले मागे राहत होती. परंतु, आदिवासी कल्याण विभागाने विशेष पुढार घेऊन येथील पालकांची समजूत घातली.






