फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Study Abroad Vs Indian Campus: ग्लोबल पदवी घेण्याचे आणि परदेशात शिकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आता मार्ग बदलले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत भारत सरकारने परदेशी विद्यापीठांसाठी आपले दरवाजे उघडल्यामुळे, जगातील टॉप शिक्षण संस्था आता स्वतःहून भारतात येत आहेत. गुजरातच्या ‘गिफ्ट सिटी’मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डीकिन युनिव्हर्सिटीने (Deakin University) पाऊल ठेवल्यानंतर आता ब्रिटन आणि अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी मुंबई, बेंगळुरू आणि दिल्ली-एनसीआरमध्ये आपले कॅम्पस सुरू केले आहेत.
परदेशी विद्यापीठांमध्ये शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे- ‘आता लाखो रुपये खर्च करून सात समुद्रापार जाण्याची गरज आहे की भारतातच या परदेशी कॅम्पसमध्ये प्रवेश घेणे अधिक शहाणपणाचे आहे?’ हा निर्णय केवळ पदवीचा नसून करिअर आणि भविष्याचा आहे. देश न सोडता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याच्या या नवीन पर्यायाचे अनेक मोठे फायदे आहेत, परंतु काही असेही पैलू आहेत ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चला तर मग समजून घेऊया कुठे शिकणे अधिक चांगले ठरेल?
अनेक नामांकित परदेशी विद्यापीठांनी भारताच्या मोठ्या शहरांमध्ये आपले कॅम्पस स्थापन केले आहेत. येत्या काही वर्षांत ही संख्या आणखी वाढेल. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या परदेशी कॅम्पसमध्ये शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे.
भारतात राहून शिकणे का फायदेशीर आहे?
खिशावर जास्त भार पडणार नाही: परदेशातील शिक्षणाचा सर्वात मोठा खर्च ट्यूशन फीचा नसून तिथे राहणे, खाणे आणि येण्या-जाण्याचा असतो. भारतात या कॅम्पसची फी मूळ देशाच्या तुलनेत ४० ते ६० टक्क्यांपर्यंत कमी आहे. त्यामुळे बँक लोनच्या जाळ्यात न अडकता ग्लोबल पदवी मिळू शकते.
व्हिसा आणि पासपोर्टच्या कटकटीतून मुक्ती: दरवर्षी हजारो विद्यार्थी केवळ व्हिसा नाकारला गेल्यामुळे किंवा नियमांमधील बदलांमुळे परदेशात जाऊ शकत नाहीत. भारतात शिकल्यास व्हिसाचे कोणतेही टेन्शन नसते आणि अनोळखी देशातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा सुरुवातीचा मानसिक ताणही जाणवत नाही.
भारतीय बाजारपेठेनुसार प्लेसमेंट: या परदेशी विद्यापीठांनी भारतातील बड्या कॉर्पोरेट्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत (MNCs) भागीदारी केली आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेतच विद्यार्थ्यांना थेट इंटर्नशिप आणि प्लेसमेंटच्या उत्तम संधी मिळतात.
परदेशी कॅम्पसमध्ये कोणत्या अडचणी आहेत?
ग्लोबल एक्सपोजरची कमतरता: परदेशात जाणे म्हणजे केवळ वर्गात बसून शिकणे नव्हे. तिथे विद्यार्थी वेगवेगळ्या देशांतील लोकांसोबत राहतात, पार्ट-टाइम नोकऱ्या करतात आणि नवीन संस्कृती शिकतात. भारतातील कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय वातावरण तर मिळेल, पण खरीखुरी ‘ग्लोबल लाईफस्टाईल’ अनुभवता येणार नाही.
कोर्सेसचे मर्यादित पर्याय: सध्या भारतात सुरू झालेली परदेशी विद्यापीठे केवळ निवडक कोर्सेस (जसे की डेटा सायन्स, बिझनेस ॲनालिटिक्स किंवा सायबर सिक्युरिटी) ऑफर करत आहेत. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट किंवा रिसर्च-बेस्ड क्षेत्रात जायचे असेल, तर कदाचित ते पर्याय सध्या येथे मिळणार नाहीत.
वर्क परमिटचे नुकसान: जर तुमचा उद्देश शिक्षणाच्या बहाण्याने परदेशात स्थायिक होणे किंवा तिथे काही वर्षे काम करून पाउंड आणि डॉलरमध्ये कमावणे हा असेल, तर भारतातील कॅम्पसधून ते शक्य होणार नाही. येथे शिक्षण घेतल्यास ‘पोस्ट-स्टडी वर्क व्हिसा’चा फायदा मिळणार नाही.
जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि कमी खर्चात अशी पदवी हवी असेल ज्याचे मूल्य संपूर्ण जगात असेल, तर भारतात उपलब्ध असलेले परदेशी कॅम्पस तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. परंतु, जर तुमचे ध्येय नवीन देश पाहणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटवर्क बनवणे आणि परदेशातच नोकरी करणे हे असेल, तर विदेशात जाऊन शिकणे हाच तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे.






