फोटो सौजन्य- सोशल मीडिया
TET Deadline Extended 2028: देशात एकीकडे बदलत्या हवामानामुळे नागरिकांना भीषण उष्णतेपासून दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने देशभरातील लाखो शिक्षकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने तूर्तास शिक्षकांना टीईटी (TET – शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण होण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढवून दिली आहे. आता शिक्षकांना ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत टीईटी उत्तीर्ण करावी लागेल. ज्या शिक्षकांनी अद्याप परीक्षा दिली नाही, त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरला आहे.
२००९ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीच्या सक्तीतून वगळण्यात यावे, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर (Review Petitions) सुनवणी करताना सर्वोच्च न्यायालायने ही मागणी फेटाळून लावत सर्व कार्यरत शिक्षकांना ठरवून दिलेल्या मुदतीमध्येच टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, असे स्पष्ट केले आहे.
नवीन निर्देशानुसार ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला (Retirement) ५ वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यांना पगारवाढीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच सेवानिवृत्तीला ५ वर्षांपेक्षा जास्त काळ असलेल्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांना नोकरी सोडावी लागू शकते. परंतु, न्यायालयाने असेही आवाहन केले आहे की, शिक्षकांनी नोकरी वाचवण्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर अधिक भर दिला पाहिजे.
टीईटी म्हणजे ‘टीचर एलिजिबिलिटी टेस्ट’ (Teacher Eligibility Test) ही परीक्षा देशभरातील सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेद्वारांसाठी आयोजित केली जाते. शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान यांसह अनेक राज्यातील लाखो अशा शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे, जे ‘टीईटी’ परीक्षा (TET Exam) उत्तीर्ण न करताच अनेक वर्ष अध्यापनाचे कार्य करत होते.






