(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वसई-विरार महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्याने शहरात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि स्थानिक पातळीवर अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जुन्या, जीर्ण आणि संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत इमारतींमध्ये असे राहणे जीवितसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने धोकादायक आणि अतिधोकादायक म्हणून घोषित इमारतींच्या रहिवाशांनी महापालिकेच्या नोटिसा व सूचनांचे काटेकोर पालन करावे, काही इमारतींमध्ये छत, स्लॅब किंवा भिंती कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सर्व गृहनिर्माण संस्था, इमारत मालक आणि व्यवस्थापनांनी पात्र संरचनात्मक अभियंत्याकडून दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. ऑडिट अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती, मजबुतीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करणे बंधनकारक असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.
धोकादायक इमारतींची लक्षणेही महापालिकेने नागरिकांसमोर मांडली आहेत. बीम, स्लॅब, स्तंभ किंवा भिंतींना मोठे तडे जाणे, काँक्रीट निखळणे, लोखंडी सळया उघड्या दिसणे, इमारत किंवा स्तंभ झुकणे, स्लॅब अथवा प्लास्टर मोठ्या प्रमाणात पडणे, असामान्य आवाज येणे आणि पावसामुळे गळती होऊन संरचनात्मक नुकसान दिसणे ही गंभीर धोक्याची चिन्हे असल्याचे सांगण्यात आले आहे.
अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ तज्ज्ञ संरचनात्मक अभियंत्याचा सल्ला घ्यावा, महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती द्यावी आणि गरज पडल्यास इमारत त्वरित रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकानी ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७, ८६६९९७६१०१ किंवा ७०५८९१११२५ या नियंत्रण कक्ष क्रमांकांवर संपर्क साधाचा, असेही महापालिकेने कळवले आहे.






