(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे ॲल्युमिनियम कॅनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे कोका-कोलाला डायट कोकसाठी वेगळी पॅकेजिंग पद्धत निवडण्यास भाग पडले आहे. याचा परिणाम आता भारतातील त्याच्या किमतीवर होत आहे.
जर तुम्ही अलीकडेच डायट कोक खरेदी केला असेल आणि जर तो तुम्हाला महाग वाटत असेल, तर यामागचं कारण फक्त महागाईमुळे नाही. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे ॲल्युमिनियम कॅनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम पॅकेजिंग बदलण्यापर्यंत झाला आहे. आणि ज्याचा खर्च नक्कीत खरेदीदारांच्या खिशातून घेतला जाणार आहे.
कोका-कोलाने भारतात डायट कोकची किंमत १०% पेक्षा जास्त वाढवली आहे. अहवालानुसार, पुरवठ्याच्या अडचणींमुळे, कंपनी आता आग्नेय आशियातून मोठे ॲल्युमिनियम कॅन मिळवत आहे. पण कंपनीने अद्याप या बदलाविषयी कोणताही तपशील अधिकृतरित्या दिलेला नाही किंवा जाहीर केलेला नाही.
ॲल्युमिनियम कॅनच्या तुटवड्याचे मुख्य कारण म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी. जशी या मार्गावरुन होणारी जलवाहतुक बंद होते त्याचा प्रदीर्घ परिणाम उत्पादनावर होतो आणि त्यानंतर किमतींवर होतो. हा सागरी मार्ग भारताला ॲल्युमिनियम कॅन आणि संबंधित कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इराणच्या संकटानंतर, या मार्गावरील मालवाहतूक अवघड झाली आहे, ज्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होत आहे आणि कंपन्यांचा खर्च वाढत आहे.
भारतात डायट कोक प्रामुख्याने ॲल्युमिनियम कॅनमध्ये विकला जातो. पूर्वी ३०० मिलीचा कॅन ₹४० ला मिळत होता, परंतु पुरवठ्याच्या समस्येनंतर कंपनीने ३३० मिलीचा कॅन ₹५० ला विकायला सुरुवात केली आहे. प्रति मिलीलीटर दरात १३.६% वाढ झाली आहे. पण कोका-कोलाने या बदलावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही भारतीय बॉटलर्सनी तात्पुरते २०० मिलीच्या काचेच्या बाटल्यांमध्येही डायट कोक विक्रीसाठी देण्यास सुरुवात केली आहे, पण मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची किंमत पूर्वीच्या कॅनपेक्षा जास्त झाल्या आहेत.
भारतात डायट कोक प्रामुख्याने ॲल्युमिनियम कॅनमध्ये विकला जातो, त्यामुळे कॅनच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका त्याला बसला आहे. दरम्यान, कोक झिरो प्लास्टिकच्या बाटल्या आणि कॅन या दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. कोका-कोला आणि पेप्सीची इतर बहुतेक पेये देखील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांमध्ये विकली जातात, त्यामुळे या संकटाचा त्यांच्यावर कमी परिणाम झाला आहे.






