हगवणे कुटुंबीयांचा पाय खोलात (फोटो- सोशल मिडिया)
पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आता आर्थिक फसवणुकीचे आरोपही होत आहेत. शशांक हगवणे याच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. महाळुंगे-चाकण येथील प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
व्यवहाराची पार्श्वभूमी
प्रशांत येळवंडे आणि शशांक हगवणे यांच्यात २५ लाख रुपये किमतीच्या जेसीबी खरेदीसंदर्भात व्यवहार ठरला होता. त्यानुसार, प्रशांत यांनी सुरुवातीला शशांक हगवणेला ५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. पुढील अटीप्रमाणे जेसीबीसाठी घेतलेल्या बँक कर्जाचे हप्ते प्रशांत हे दरमहा ५० हजार रुपये शशांक हगवणेला देत होते. हा व्यवहार एक विश्वासावर आधारित असतानाही, शशांकने हप्ते न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला.
दरम्यान, शशांक हगवणेने जेसीबी बँकेकडून सोडवून आणल्याचा दावा केला, मात्र, प्रशांत येळवंडे यांनी जे पैसे दिले होते, त्यापैकी एकाही रुपयाची परतफेड करण्यात आली नाही. या व्यवहारातून प्रशांत यांना एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “हगवणेंनी दोन वेळा लग्न…”
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
आर्थिक फसवणुकीबाबत महाळुंगे-चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हगवणे कुटुंबीयांवर वाढत चाललेला दबाव
या प्रकरणामुळे आधीच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शशांक हगवणेवर याआधी गर्भवती पत्नीस छळ, हुंडा मागणी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाला असून तो कोठडीत आहे. यातच आता आर्थिक फसवणुकीचे नवे प्रकरण उघड झाल्यामुळे पोलिसांच्या तपासाची व्याप्ती अधिक वाढणार असल्याचे संकेत आहेत.
पिस्तुल दाखवून धमकी प्रकरणही चर्चेत
हगवणे कुटुंबातील सदस्याने पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पिस्तुल दाखवून धमकावल्याचा आरोप होत आहे. मात्र, त्यावेळी दबावामुळे पिस्तूलाचा उल्लेख केला नसल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. आता पोलीस पिस्तूल दाखवल्याचा आरोप दाखल करून घेणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हगवणेंच्या बैलजोडीसामोर नाचल्यावर गौतमीची वैष्णवीच्या मृत्यूवर प्रतिक्रिया; म्हणाली, “जे काही झालं…”
प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी कागदपत्र पडताळणी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
– शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड.