संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वडगाव शेरी परिसरात वार्षिक यात्रा सुरू असताना टोळक्याने मध्यरात्री वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीमुळे मात्र, येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी रोपी सोमेश्वर पांचाळ, साहिल राठोड, बजरंग पाटोळे, स्वप्नील तुपसमिंद्रे, राज गायकवाड, शरद कांबळे, रोहित राठोड, अल्ताफ शेख, गणेश सलगर, कुणाल परिहार, ओमी, विठ्ठल, मनोज नवगिरे यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रोहित धनाजी देसाई (वय २४, रा. योगेश्वर सोसायटी, वडगाव शेरी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वडगाव शेरीत ग्रामदेवतेची दोन दिवस यात्रा होती. यात्रेत हे टोळके शिरले. त्यांनी आरडाओरडा करत तेथून ये-जा केली. रस्त्याने आरडत निघालेल्या एकाने त्यांना हटकले. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास टोळके कुरकुटे हॉस्पिटलजवळच्या गल्लीत शिरले. त्यांनी त्यांच्याकडील लाकडी दांडक्याने मोठ-मोठ्याने शिवीगाळ करुन वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. टोळक्याने दोन रिक्षा, तसेच दहा ते बारा दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. पळालेल्या आरोपींना पकडण्यात आले.
धनकवडीत वाहनांची तोडफोड
पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गुन्हेगारांकडून वाहनांचे खळखट्याकचे प्रकार सुरूच असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडत असून, यामध्ये सर्व सामान्य नागरिक भरडले जात आहेत. गेल्या काही दिवसाखाली धनकवडीत कोयतेधारी टोळक्याने कार तसेच दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्यावर गुन्हा दाखल केला असून, प्रकरणात साहिल दुधाणेला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुधाणे याच्याशी चव्हाणचा वाद झाला होता. त्याचा राग दुधाणे याच्या मनात होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार कारच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी कारमधून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण अधिक तपास करत आहेत.