अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् फूस लावून पळवलं; आरोपीवर सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
परभणी : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी रोशन प्रकाश डोंगरे (रा. सेलू) याच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.11) दुपारच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन याचे मुलीच्या पालकांशी संबंध असल्याने त्याचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. या ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने बुधवारी (दि.10) दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलीचे आई-वडील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात गेले असताना मुलीला घरातून फूस लावून पळवून नेले. मुलीने घरातील सोन्याचा गोफ, कानातील रिंग तसेच तिच्या नावावर जमा असलेल्या स्टेट बँक खात्यातील तब्बल ६० हजार रुपये काढून घेत आरोपीसोबत पलायन केले.
दरम्यान, आई-वडील परत आल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच त्यांनी गावात शोध घेतला. त्यावेळी मुलगी रोशनसोबत गेल्याचे उघड झाले. यानंतर मुलीच्या वडिलांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून गुरुवारी (दि. ११) दुपारी ३ वाजता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये होतीये वाढ
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच पुण्यातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली होती. अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर वारंवार मेसेज करून तसेच तिचा पाठलाग करून तिच्या भावाला मारहाण केली. त्याला हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोहेल उमर शेख याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.