संग्रहित फोटो
मंचर : आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या खुनाची धक्कादायक घटना शुक्रवारी ( दि. ५) पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान, या खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर ‘वन मॅन शो कसा ठोकला’ अशा आशयाचे स्टेटस बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घोडेगाव पोलिसांनी एका विद्यार्थ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ संतोष साखरे (वय २३) हा विद्यार्थी वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. झोपेत असतानाच त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईप व सिमेंटच्या गट्ट्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी अमय भिका कोकरे (वय १९) याने पूर्वी झालेल्या भांडणाचा तसेच अनिरुद्ध साखरे याच्यासोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
दरम्यान, या खुनानंतर आरोपीने सोशल मीडियावर “वन मॅन शो” कसा ठोकला अशा आशयाचे स्टेटस बनवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या स्टेटसमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या बाबीचीही चौकशी केली जात आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि सोशल मीडियावरील हालचाली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






