सौजन्य - नवराष्ट्र टीम
इंदापूर : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी देवकर परिसरात पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात होऊन क्रूजर जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. टायर फुटल्याने जीप रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.१४ एल. बी.१६१३ क्रमांकाची क्रूजर जीप लोणी देवकर एमआयडीसीकडे जात असताना सकाळी ९ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक तिचा टायर फुटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्ता दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या एम.एच.१२ वाय क्यू.६६०३ क्रमांकाच्या ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण धडकेत जीपचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला.
अपघात इतका गंभीर होता की चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रमोद बाळासो खवळे (वय २८, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), शशांक कोटिया (वय ३२, रा. गौतमनगर, गिरड, ग्वालियर, मध्य प्रदेश) आणि विजयसिंह राजपूत (वय ३५, रा. त्रीलोकनगर, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. हे तिघेही लोणी देवकर एमआयडीसीमधील खासगी कंपनीत कार्यरत होते.
घटनेची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, सहायक फौजदार बालगुडे, जगदाळे यांच्यासह पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील धक्कादायक घटना
शुक्रवारी पहाटे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रक एका वाहनावर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ट्रकमधील दोन क्लिनर जखमी झाले आहेत. नासीर मोहम्मद शाह मोहम्मद चौधरी (वय ३६, सध्या रा. कुदळवाडी, मोशी रस्ता, चिखली, मूळ रा. कलवारीनानकार, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. अपघातात ट्रकमधील मदतनीस अर्जुनकुमार मौर्या (वय २४, सध्या रा. मोरे चौक, अशोक काॅलनी, चिखली) याच्यासह आणखी एक जण जखमी झाला आहे. याबाबत मौर्या याने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.






