संग्रहित फोटो
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील एका व्यक्तीला संमलैंगिक अॅपवरून ओळख निर्माण करून भेटण्यास बोलविल्यानंतर त्याला तिघांनी बेदम मारहाण करून लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, शाहरूख टॉप व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा नोंदविला आहे. १८ मार्च रोजी ही घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती पिंपरी-चिंचवड शहरातील आहे. संमलैंगिक अॅपवरून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच, त्याला भेटण्यासाठी बोलविले. आरटीओ चौकात तक्रारदार व आरोपी भेटले. तक्रारदार परत निघाले. त्यावेळी या तिघांनी पुन्हा त्यांना परत बोलविले. नंतर त्यांना रेल्वे रुळावरून पायी चालत निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी पैशांची मागणी केली. त्यांच्यात वादविवाद झाले. त्यावेळी चौघांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने घेतली. तसेच, त्यांचा मोबाईल फॉरमॅट केला. नंतर आरोपी तेथून पळून गेले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
फ्लेक्सवर नाव न टाकल्याने मारहाण
फ्लेक्सवर नाव टाकण्यावरुन झालेल्या वादातून एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात चौघांना गज तसेच बांबुने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत संजय राजेंद्र तावरे (वय ३६, रा. जांभळी, सांगरुण, ता. हवेली) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी रुपेश तावरे, दीपक तावरे, वैभव तावरे, विष्णू उघडे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फ्लेक्सवर नाव न टाकल्याने आरोपींनी गावातील मुलांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (१८ मार्च) घडली. संजय तावरे यांनी मध्यस्थी केल्याने आरोपींनी तावरे तसेच त्यांचा भाऊ संदीप, गणेश चौधरी, स्वप्नील बाबर यांना गज व बांबूने मारहाण केली. आरोपींनी गावात दहशत माजविली. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर करत आहेत.