TET च्या तणावातून शिक्षिकेची आत्महत्या; इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन (File Photo : Suicide)
नाशिक : सध्या शिक्षकांसाठी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अडचणीची ठरताना दिसत आहे. याच परीक्षेच्या तणावातून ४० वर्षांच्या शिक्षिकेने राहत्या इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना इंदिरानगर परिसरातील कमोदनगर येथे घडली. घटनेची माहिती समजल्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत असून, टीईटी परिक्षा आता समाजाला आरसा दाखवणाऱ्या शिक्षकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे.
स्वाती दीपक पवार (वय ४०, रा. गोदावरी अपार्टमेंट, कमोदनगर, इंदिरानगर) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. पवार या काही वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पती व मुलांसह त्या इंदिरानगरमधील कमोदनगर परिसरात वास्तव्यास होत्या. बुधवारी दुपारी तीन वाजता वाजता घरात असताना अचानक पवार राहत्या इमारतीच्या छतावर पोहोचल्या आणि क्षणांत उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जबाब घेतले.
हेदेखील वाचा : Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, स्वाती पवार या गेल्या काही काळापासून टीईटी परीक्षेच्या तयारीत गुंतल्या होत्या. परीक्षेशी संबंधित ताणतणाव आणि भवितव्याबाबतची चिंता त्यांना सतावत होती. याचमुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या. घटनेच्या वेळी त्या एकट्याच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पती सैनिकी शाळेत कार्यरत
स्वाती यांचे पती दीपक पवार हे शहरातील एका सैनिकी शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी असून, या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक उपनिरीक्षक साळी करत आहेत. पवार कुटुंब शिक्षित व स्थिरस्थावर असून आत्महत्येच्या कारणांचा तपास करत आहेत.
सततच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
कानपुर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने प्रेयसीच्या सततच्या छळाला कंटाळून आपले आयुष्य संपवले आहे. तो कानपूरचा रहिवासी आहे. तो आसाममधील डिब्रूगड येथे सैन्यभरतीची तयारी करण्यासाठी गेला होता. तिथे त्याने राहत्या खोलीत आत्महत्या केली. दिपू यादव असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी प्रेयसीने त्याला व्हिडीओ कॉल केला होता आणि त्याच वेळी हा टोकाचा पाऊल उचलल्याचे आरोप कुटुंबयांनी केला आहे.






