संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहर पोलिस दलात नेमंक चाललाय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे पोलिस दलातील महिला अधिकारी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत अडकल्या आहेत. शनिवारी महिला सहाय्यक निरीक्षकाला तब्बल ३० लाखांच्या लाच प्रकरणात सापळा कारवाईत पकडले. या महिला अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला एसीबीने रंगेहात भररस्त्यात पकडले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित महिला अधिकाऱ्यांची प्रमोशनवर (बढती) मुंबईल लोहमार्ग विभागात बदली झाली होती. त्यांना पुणे पोलिस दलातून कार्यमुक्त देखील केले होते. तरीही त्यांनी लाच घेतल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही कारवाईमुळे मात्र पुणे पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. वैशाली मुरलीधर तोटेवार (वय ४९) असे महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. आणि खासगी व्यक्ती संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७) यालाही पकडले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
वैशाली तोटेवार शहर पोलिस दलात सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा येथे होती. दरम्यान, नुकतेच त्यांचे गृहविभागाने सहाय्यक पोलिस निरीक्षकवरून पोलिस निरीक्षक अशी बढती (प्रमोशन) केली होती. बढती करून त्यांची पुण्यावरून मुंबई लोहमार्ग येथे बदली केली होती. बदलीनंतर पुणे पोलिसांनी त्यांना शुक्रवारी रिलीव्ह (कार्यमुक्त) केले होते. मात्र, नव्या पदावर रुजू होण्यापूर्वीच महिला सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवर यांनी खासगी व्यक्तमार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड जवळ २८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या घटनेनंतर या महिला पोलिस अधिकार्यांच्या पोलीस आयुक्तालयातील रुमचा सर्च घेतला जात आहे.
२ लाख रुपयांची लाच यापूर्वी घेतली होती
वैशाली यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांच्याकडे ८ ते ९ तक्रार अर्ज तपासासाठी दिले होते. यातील तक्रारदार यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे जमीनीबाबत एका व्यक्तीविरोधात अर्ज दिला होता. तो अर्ज वैशाली यांच्याकडे तपासासाठी होता. या अर्जाची चौकशी तक्रारदार यांच्या बाजूने करून गैर अर्जावर कारवाई करण्यासाठी तक्रारदारांकडे ३० लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यातील २ लाख रुपयांची लाच यापूर्वी घेतली होती. उर्वरित २८ लाख रुपयांसाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची एसीबीकडे तक्रार दाखल
त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. नंतर शनिवारी दुपारी २८ लाख रुपयांची लाच घेताना संभाजी चव्हाण याला एसीबीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर लागलीच महिला अधिकारी वैशाली तोटेवर यांना पकडण्यात आले.






