सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) बहुप्रतीक्षित १४ वी वार्षिक सभा उद्या, सोमवारी (४ मे) मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत आगामी २०२६-२७ आर्थिक वर्षाचा सुमारे ४,६२८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांचे नाव देण्याबाबत या सभेत शिक्कामोर्तब होणार का, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे होणाऱ्या या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे पैलू
वित्त विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीचा अर्थसंकल्प ‘शिलकीचा’ राहण्याची शक्यता आहे. यामध्ये पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. अभियांत्रिकी विभागासाठी सर्वाधिक तरतूद : रस्ते, रिंग रोड आणि उड्डाणपुलांच्या कामांसाठी सुमारे २,९१८.८१ कोटींची तरतूद अपेक्षित आहे.
विकास प्रकल्पांना गती : मेट्रो मार्गिका ३ आणि पुणे महानगर क्षेत्रातील दळणवळण प्रकल्प पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पाचा मुख्य भर असेल.
आर्थिक सक्षमता : प्राधिकरणाची वाढती उत्पन्न साधने पाहता, हा अर्थसंकल्प भांडवली गुंतवणुकीसाठी मैलाचा दगड ठरेल.
उड्डाणपुलाच्या नामांतराची चर्चा का?
गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रोसह दुमजली उड्डाणपुलाचे नियोजन आणि अंमलबजावणीत स्व. अजित पवार यांचे मोठे योगदान होते. या प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचे सूतोवाच केले होते. त्यामुळे उद्याच्या सभेत मुख्यमंत्री आपल्या आश्वासनाची पूर्तता करून या पुलाला अधिकृतपणे नाव देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






