संग्रहित फोटो
पुणे : ऑन ड्यूटी नेमप्लेट झाकून (लपवून) ठेवणे अथवा उलटी लावणे तसेच मुद्दाम खिशात मोबाईल ठेवून नेमप्लेट दिसणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे. ड्यूटीवर असताना नेमप्लेट लपवल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातत्याने असे अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत असतात या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
पुणे शहरात वाहतूक नियमन किंवा कारवाईदरम्यान अनेक पोलिस कर्मचारी गणवेशाच्या वरच्या खिशात मोबाईल फोन ठेवतात. त्यामुळे त्यांच्या नावाची पाटी (नेमप्लेट) पूर्णपणे झाकली जाते. अथवा, नेमप्लेट खाली लटकेल (नाव दिसणार नाही) अशा पद्धतीने ती लावली जाते. परिणामी, संबंधित पोलिस कर्मचार्याचे नाव नागरिकांना दिसत नाही. त्यांची ओळख पटविणे कठीण होते. काही ठिकाणी कारवाई करतानाच नेमप्लेट झाकण्याची पद्धत रूढ झाल्याचेही वरिष्ठांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या पारदर्शकतेवर तसेच शिस्त यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत शहरातील सर्व पोलिस ठाणे, वाहतूक शाखा तसेच इतर विभागांना लेखी आदेश पाठविले आहेत. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्याची नेमप्लेट कर्तव्यावर असताना स्पष्टपणे दिसेल, याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर टाकण्यात आली आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पोलिस प्रशासनाने यापूर्वी नेमप्लेट स्पष्ट ठेवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचे पालन होत नसल्याने वारंवार आढळून आले. त्यामुळे आता जाणूनबुजून नेमप्लेट झाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचार्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा आदेशातून देण्यात आला आहे. पोलिस दलात शिस्त आणि उत्तरदायित्व वाढविण्यासोबत नागरिकांना समोर असलेल्या पोलिस कर्मचार्याची ओळख सहज पटावी, या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले. प्रशासन विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
आदेशात नेमके काय?






