संग्रहित फोटो
उंब्रज/अनिल कदम : कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसी परिसरातील एका पशुखाद्य उत्पादक कंपनीमध्ये शासनाचा अनुदानित निम कोटेड युरिया वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पशुधनाच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तासवडे एमआयडीसीतील श्री फीड इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीवर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईदरम्यान तब्बल २ हजार ४० किलो अनुदानित युरिया जप्त करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी अचानक छापा टाकला असता, संबंधित कंपनीमध्ये पशुखाद्य निर्मितीसाठी युरियाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीवेळी ५० किलो वजनाच्या ४० गोण्या आणि ४० किलोची एक उघडलेली गोणी असा मोठा साठा आढळून आला. प्रयोगशाळेच्या अहवालात हा युरिया केंद्र शासनाचा अनुदानित निम कोटेड युरिया असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, हा युरिया केवळ शेतीसाठी राखीव असून औद्योगिक किंवा इतर वापरासाठी त्यास सक्त मनाई आहे. मात्र शासनाची दिशाभूल करून तो पशुखाद्य निर्मितीत वापरल्याचा आरोप संबंधित कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
या कारवाईत जिल्हा भरारी पथकाचे अध्यक्ष गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे तसेच कराडचे खते निरीक्षक व कृषी अधिकारी अभिजीत पाटील यांनी सहभाग घेतला होता. कृषी विभागाच्या अहवालामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
दरम्यान, हा अनुदानित युरिया कोणत्या खत विक्रेत्याकडून कंपनीपर्यंत पोहोचला? हा प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू होता का? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे मोठे आव्हान तळबीड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
यापूर्वीही तासवडे एमआयडीसी विविध बेकायदेशीर प्रकारांमुळे चर्चेत आली होती. काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज निर्मितीप्रकरणी एका कंपनीवर राज्यातील पोलिसांनी छापा टाकला होता, तर दुसऱ्या एका कंपनीत केमिकल स्फोटाची घटना घडली होती. आता पशुखाद्यात युरियाचा वापर उघड झाल्याने “तासवडे एमआयडीसीमध्ये नेमके चाललेय काय?” असा सवाल नागरिक आणि शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
पशुपालकांनी संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करून कंपनी सील करण्याची मागणी केली आहे. तसेच शासनाचा अनुदानित युरिया पुरवणाऱ्या संबंधित खत विक्रेत्याचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या प्रकरणी कृषी विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार श्री फीड इंडस्ट्रीज प्रा. लि., तासवडे, व्ही.आर. इंडस्ट्री केमिकल, बिलिमोरा (गुजरात) तसेच कृषी विभागाच्या परवानाधारक अज्ञात कृषी निविष्ठा विक्रेत्याविरोधात तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मोठे आव्हान आता तळबीड पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
हे सुद्धा वाचा : दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई






