सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू धंद्यांचे नेटवर्क पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासन विभाग आता अधिक आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय समन्वय बैठक पार पडली. “अवैध दारूच्या साखळीतील प्रत्येक दुव्यावर आता संयुक्त प्रहार…” या मुख्य संकल्पनेभोवती या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. यामध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) पुणे विभागाचे सह आयुक्त गिरीष हुकरे उपस्थित होते. याशिवाय पुणे शहराचे पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-४) चिलूमूल्ला रजनीकांत आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनीही या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.
या समन्वय बैठकीत प्रामुख्याने भेसळयुक्त दारूची निर्मिती, अवैध दारू गाळणे (हातभट्टी) आणि बेकायदेशीर दारू विक्रीच्या छुप्या जाळ्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विविध विभागांमध्ये अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहितीची तातडीने देवाणघेवाण करणे आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयाने अधिक प्रभावी व मजबूत अंमलबजावणी करणे यावर एकमत झाले.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त दारू उत्पादकांवर आणि हातभट्ट्यांवर केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर सर्व विभागांच्या संयुक्त पथकांद्वारे थेट छापे टाकले जाणार आहेत. अवैध दारू साखळीतील मुख्य सूत्रधार, कच्चे रसायन पुरवणारे आणि वाहतूक करणाऱ्यांवरही मोक्का किंवा तत्सम कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या मोहिमेची अधिकृत माहिती दिली आहे.






