संग्रहित फोटो
कराड : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कराडमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड शहरानजीकच्या विद्यानगर, कृष्णा कॅनॉल बाजूकडून शहरात जाणाऱ्या ईको कारने सुमारे ३०० मीटर अंतरात सात वाहनांना उडविल्याची थरारक घटना घडली आहे. शुक्रवार (दि. २५) रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. यामध्ये ईको कारसह चार दुचाकी, दोन रिक्षा व एका कारचे मोठे नुकसान झाले. अपघातात सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालय व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात संजय पवार, सुषमा पवार यांच्यासह रफिक मुजावर (वय ३४, रा. चौंडेश्वरीनगर), विशाल उथळे (वय २२), कल्याण बेडके (वय ३४, रा. सैदापूर), समीर चौधरी (वय २६, रा. सातारा), शिवानी भोसले (रा. खोडशी) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालय व खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांनी ईको चालक संजय सर्जेराव पवार (वय ६३, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड) यांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास संजय पवार व त्यांच्या पत्नी सुषमा पवार त्यांच्या ईको कारने कृष्णा कॅनॉल बाजूकडून कराड शहरात येत होते. कॅनॉलच्या पुढच्या बाजूला ईको कारने प्रथम रिक्षाला धडक दिली. यानंतर एका दुचाकीला धडक दिली. कृष्णा पुलावरून शहरात आल्यावर ईको कारने बालाजी हॉस्पिटलजवळ एका कारला जोराची धडक दिली. या कारजवळ पार्क केलेल्या एका दुचाकीलाही धडक देऊन ईको कारने बालाजी हॉस्पिटलसमोर उभा असलेल्या रिक्षा व दोन दुचाकींनाही धडक दिली. यामध्ये दुचाकीवर रिक्षा पलटी झाली. या रिक्षावर ईको कार पलटी झाली. कारच्या धडकेने बालाजी हॉस्पिटलजवळ असलेले एक झाड उन्मळून पडले आहे.
अपघातग्रस्त वाहने कराड शहर पोलीस ठाण्यात
यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पलटी झालेली कार सरळ करून त्यातील महिला व नागरिकाला बाहेर काढून बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, कृष्णा कॅनॉलपासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत कराड शहरात आलेल्या ईको कारमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बालाजी हॉस्पिटलसमोरील परिसरात ईको कारसह अन्य कार व तीन अपघातग्रस्त दुचाकी पडल्या होत्या. वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस घटनस्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम बघ्यांची गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. सर्व अपघातग्रस्त वाहने कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
ईको कारचालक महिला की पुरूष?
ईको कारच्या थराराची चर्चा शहरात सुरू होती. कृष्णा कॅनॉलपासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत निघालेल्या ईको कारचा अनेक वाहनचालकांनी पाठलाग केला. अखेर बालाजी हॉस्पिटलजवळ एक रिक्षा, कार व तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर ईको कार पलटी झाली. यावेळी अपघतग्रस्त वाहनांचे मालक व उपस्थित नागरिकांनी महिला कार चालवत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी संजय पवार कार चालवत असल्याचे सांगितल्याने अपघातग्रस्तांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.