संग्रहित फोटो
कराड : कार्वे (ता. कराड) येथील एका मद्यधुंद डॉक्टरने भरधाव कार चालवित दोन दुचाकींना उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात दोन महिला व एक पुरुष असे तीन जण जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. १६) रात्री आठच्या सुमारास मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यावर महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळ ड्रंक अँड ड्राईव्हचा हा थरार घडला.
डॉ. राजाराम जगताप (रा. कार्वे, ता. कराड) असे मद्यधुंद डॉक्टरांचे नाव आहे, तर पोपट कांबळे (वय अंदाजे ६५) रा. आगशिवनगर व भंडारे मायलेकी (वय अंदाजे ६० आणि ३५ रा. आगाशीवनगर अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद डॉक्टरला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मात्र पोलिस ठाण्यातही डॉक्टरने धिंगाणा घातला. मेडिकल चेकअपसाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हाही त्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांशी हुज्जत घातली.
काही वेळातच वाहतूक कोंडी
ढेबेवाडी फाटा येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास आगाशिवनगर ते ढेबेवाडी फाटा या लेंनवर भरधाव वेगाने कारमधून आलेल्या डॉक्टरने कराडकडे निघालेल्या दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये पोपट कांबळे (रा. आगशिवनगर) व भंडारे मायलेकी (रा. आगाशीवनगर) तीन जण गंभीर जखमी झाले. दुचाकींचेही नुकसान झाले आहे. काही वेळातच तेथे वाहतूक कोंडी होऊन बघ्यांची गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले
सोलापूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात
सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. आशिष हे रविवारी मिटींगकरिता सोलापुरात आले होते. तेथील मिटींग संपल्यानंतर ते आसरा चौक परिसरात राहत असलेल्या बहिणीच्या घरी काही वेळ थांबले. त्यानंतर रात्री उशिरा ते तडवळ गावाकडे जाण्यासाठी सोलापुरातून कार (एमएच १३ सीएस ०३०८) चालवित निघाले होते. हत्तूर शिवारातून जात असताना, नाईकवाडी यांच्या शेताजवळ त्यांची कार बाजूच्या शेतात पलटी झाली. यात डॉ. आशिष हे कारखाली सापडले होते. सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीचे याकडे लक्ष गेले. त्या व्यक्तीने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांना कार उचलून बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत आशिष यांना उपचाराकरिता हवालदार घुगे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.