संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातसा असून, पादचारी तसेच दुचाकीस्वार महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. खराडी आणि हडपसर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील व पर्समधील दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या असून, दोन घटनांमध्ये एकूण सव्वाचार लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत.
पहिली घटना खराडी येथे घडली असून, याप्रकरणी महेंद्र नारायण चौधरी (वय ४३, रा. हडपसर) यांनी खराडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. चौधरी यांच्या पत्नी जळगावहून पुण्याकडे येत होत्या. खराडी येथील जनक बाबा दर्गा ते आकाशवाणी चौक या प्रवासादरम्यान बसमध्ये त्यांच्या पर्समधील सोन्याचे आणि डायमंडचे एकूण तीन लाख ८२ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरले.
दुसरी घटना शेवाळवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी राखी रोकडे (वय ३७, रा. विठ्ठलनगर, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्या १४ जुलैला रात्री आठच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी हिसकावले आणि पळ काढला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटना लक्षात घेता, गर्दीच्या ठिकाणी किंवा एकट्याने प्रवास करताना महिलांनी दागिन्यांची सुरक्षितता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासादरम्यान गरजेपुरतेच दागिने घालणे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : ‘तू माझी गर्लफ्रेंड हो, नाहीतर मी…; अल्पवयीन मुलाची तेरा वर्षाच्या मुलीला धमकी
वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश करुन चोरी
गेल्या काही दिवसाखाली दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून सराफी दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत. बाजीराव रोडवरील बुधवार पेठेतील आर. जे. ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रितेश यांचे आर. जे. ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. दरम्यान, दुकान दुमजली आहे. खाली सोने विक्रीचे दुकान तर वरती दागिने बनविण्याची जागा व वॉशरूम आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून गेले होते. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तसेच, दुकानातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ४ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.