संग्रहित फोटो
सेनगाव : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अशातच आता सेनगाव-रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील वाढोणा येथील पोदार इंग्लिश स्कूलजवळ रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १ ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप होत असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानकनेरगाव (ता. सेनगाव) येथील निलेश सुरेश बांगर (वय २७) आणि सुमित कैलास बांगर (वय २३) हे दोघे रिसोड येथे मजुरीचे काम करून दुचाकीने गावाकडे परतत होते. वाढोणा येथील पोदार इंग्लिश स्कूलजवळ रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठा येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेने पानकनेरगाववर शोककळा पसरली आहे.
सुमित होता आई-वडीलांना एकुलता मुलगा
मृत सुमित हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आता घरातील कर्ता मुलगाही गेल्याने बांगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी तीव्र हळहळ व्यक्त केली.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
सेनगाव-रिसोड महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेश जाधव, तुकाराम मारकळ, परशुराम नागरे आणि चालक शिरसागर पुढील तपास करीत आहेत.






