सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : नागरिकांच्या जिवाला धोका ठरणाऱ्या आणि परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जवर अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हातोडा चालवला खरा; मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी या कारवाईला दुर्घटनेचे गालबोट लागले आहे. हिंजवडी येथील लक्ष्मी चौक परिसरात कारवाई सुरू असताना महाकाय होर्डिंगचा भार न पेलल्याने शंभर फूट बूम बाहेर काढलेली क्रेन अचानक दुकानांवर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची दुकाने आणि वाहनांचा चक्काचूर झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गुरूवार (दि. ३० जुलै) आणि शुक्रवार (दि. ३१ जुलै) अशा दोन दिवसांत पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हिंजवडीतील गट क्रमांक २६२ आणि २६३ मध्ये ही कारवाई राबवली. शुक्रवारी लक्ष्मी चौकात एक महाकाय अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे काम सुरू होते. होर्डिंगचा सांगाडा हवेत उचललेला असतानाच अचानक क्रेनचा जॅक फेल झाला आणि क्रेनचे संतुलन बिघडले. जवळपास १०० फूट बूम असलेली ही महाकाय क्रेन लगतच्या पत्राशेडच्या दुकानांवर जावून कोसळली. क्रेन पडताच परिसरात एकच पळापळ आणि अफरा-तफरी माजली.
काय झाले नुकसान?
दुकाने : ३ दुकानांचा (पत्राशेड) अक्षरशः चक्काचूर.
वाहने : १ टेम्पो आणि १ दुचाकी पूर्णपणे क्रॅश.
सहानुभूतीची गरज : पादचारी व स्थानिक वेळीच बाजूला सरकल्याने अनर्थ टळला; परंतु गोरगरीब दुकानदारांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले.
८ पैकी ६ होर्डिंग्ज मालकांनीच हटवले
लक्ष्मी चौकात पीएमआरडीएच्या पाहणीत एकूण ८ महाकाय अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले होते. प्रशासनाने कारवाईचा थेट इशारा दिल्यानंतर, कारवाईच्या धास्तीने संबंधित फलकधारकांनी स्वतःहून ६ होर्डिंग्ज रातोरात काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. उर्वरित २ होर्डिंग्ज पाडण्यासाठी आलेल्या पथकाला दोन दिवसांत केवळ ते दोन होर्डिंग्ज पाडता आले आणि त्यातही क्रेन कोसळण्याची नामुष्की ओढवली.
‘लक्ष्मी चौक मोकळा श्वास कधी घेणार?’
आयटी पार्कचे प्रवेशद्वार असलेल्या लक्ष्मी चौकात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा आणि फुटपाथवर उभारलेली शेकडो अनधिकृत दुकाने, पत्राशेड्स आणि अन्नपदार्थांच्या गाड्या आहेत. अनधिकृत होर्डिंग्जवर तुटपुंजी कारवाई करणाऱ्या पीएमआरडीएला ही रहदारीला अडथळा ठरणारी पत्राशेड्स आणि अनधिकृत दुकाने का दिसत नाहीत? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.
हे सुद्धा वाचा : ऑनलाइन शंभर मित्र, पण ‘जिवलग’ किती? तरुणाईच्या नजरेतून डिजिटल मैत्रीचा नवा चेहरा
नुकसानभरपाई कोण देणार? पीडित व्यापारी वाऱ्यावर!
दुर्घटनेत पत्राशेड, टेम्पो आणि दुचाकीचे नुकसान झालेल्या लहान व्यावसायिकांना आता रोजच्या पोटापाण्याची चिंता भेडसावत आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई कोण देणार? असा सवाल बाधित व्यावसायिक विचारत आहेत; मात्र पीएमआरडीएकडून यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण अथवा मदतीचे आश्वासन दिलेले नाही.






