अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचा कट? 1 लाखांची ऑफर आणि 50 जण..., तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज
Beed Crime News In Marathi : अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीड मधील एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. या तरुणाला मंदिर उडविण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, या मेसेजमध्ये असे नमूद केले आहे की, कटात सहभागी होण्यासाठी आणखी ५० लोकांची आवश्यकता आहे. या संपूर्ण घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तरुणाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहात हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी १ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. या कामासाठी ५० लोक हवे असून त्यांना प्रत्येकी 1 लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयिते मेसेजद्वारे सांगितले आहे.
मेसेज पाठवणाऱ्याने पाकिस्तानातील कराची येथील लोकेशनही शेअर केले आहे. या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. हे तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर २०२४ मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. त्यानंतर त्याला बिहारमधील भागलपूरमध्ये अटक करण्यात आली. जानेवारी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच अनेक धमक्या आल्या होत्या. यानंतर, एप्रिल २०२५ मध्ये अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना पाठवण्यात आले होता. हा ई मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती समोर आली होती. तर ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’ असं देखील धमकीच्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते. आता बीडच्या तरूणाला थेट पाकिस्तानमधून अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासाठी मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे.