पाटणमध्ये भीषण अपघात (फोटो - istockphoto)
पाटण: तालुक्यातील पाटण ते सडावाघापूर मार्गावर गुजरवाडी येथे चारचाकी व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार राहुल संजय पवार (वय ४३, रा. सैदापूर, सातारा) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवार ८ रोजी सकाळी घडली. अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिसांत रात्री उशिरा झाली आहे.
याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार दि. ८ रोजी अंकुश लक्ष्मण झोरे (वय २५, धारेश्वर दिवशी, पाटण) हे स्विफ्ट कारमधून पाटण ते सडावाघपूरमार्गे सातारच्या दिशेने निघाले होते. गुजरवाडी येथील घाटात खंडूआई देवीच्या मंदिरासमोरील वळणावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कार व समोरून पाटणच्या दिशेने निघालेल्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली.
दुचाकीवरील आप्पासो शंकर चिरे आणि चालक राहुल पवार (रा. सैदापूर, सातारा) हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकी चालक राहुल पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिसात झाली असून अधिक तपास मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन मचले, उपनिरीक्षक वेताळ, ठाणे अंमलदार शेडगे करत आहेत.
टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात
अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावर मस्के वस्तीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. हा अपघात रविवार, ८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ओंकार बाबासाहेब शिंदे (वय १८, रा. करकंब, ता. पंढरपूर), प्रशांत कुंडलिक खडतरे (वय २२, रा. अकलूज, ता. माळशिरस) आणि निखिल अनिल वंजारे (वय २०, रा. करकंब, ता. पंढरपूर) यांचा समावेश आहे. सुरज अरुण लोखंडे (वय १८, रा. उपरी, ता. पंढरपूर), दयानंद उर्फ बंटी जाधव (वय २२, रा. अकलूज), आणि प्रशांत खडतरे हे तिघे एमएच ४५ एडब्ल्यू २६४९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून अकलूजच्या दिशेने जात होते.
Madha Accident News: दुर्दैवी ! टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत कुंडलिक खडतरे यांचा आजच वाढदिवस होता. विशेष म्हणजे त्यांच्या भावाचे लग्न ठरल्याने ते पत्रिका वाटपासाठी सोलापूरला गेले होते. काम आटोपून ते घरी परतत असताना वाटेतच अपघात घडला आणि त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यूने त्यांना गाठले. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.