(फोटो सौजन्य: Pinterest)
पोलिसांनी बुधवारी घटनेची माहिती देताना सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी भरत सिंह गहरवार आपल्या साथिदारांसोबत फॉर्च्यूनर गाडीने नवगई गावाच्या दिशेने जात होता. याचवेळी आरोपींनी कथितरित्या एका टिपर वाहनाने त्यांच्या फॉर्च्युनरला अनेक वेळा धडक देऊन तिचे नुकसान केले. त्यानंतर त्यांनी वाहनावर पेट्रोल ओतून त्याला आग लावली.
सांगितले जात आहे की, वारंवार बसलेल्या धडकेमुळे गाडीचे दरावाजे ऑटोमॅटीक लाॅक झाले. यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना गाडीच्या बाहेर निघता आलं नाही. खिडकी फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी फॉर्च्युनरमधील प्रवाशांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. या घटनेत भाजप नेता गहरवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर फॉर्च्यूनर गाडीत बसलेल्या अन्य तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबिकापुर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक लगेच घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी या प्रकरणात मनोज त्रिपाठी, निशांत त्रिपाठी यांच्यासह एकूण चार जणांना अटक केली आहे. तथापि इतर संशयितांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान अटक केलेला आरोपींचाही भाजपसोबत संबंध असल्याचे म्हटले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत भरत सिंह आणि आरोपी मनोज त्रिपाठी यांच्यात वाळूच्या व्यावहारावरुन वाद सुरु होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली होती ज्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. दरम्यान पोलिस या घटनेचा आता सखोल तपास करत आहे. जळालेली फॉर्च्यूनर कार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, वाहनाला आग पेट्रोल टाकून लावण्यात आली होती की विजेच्या खांबाला धडकल्यामुळे लागली, याचा तपास अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.






