Representative Image (Photo - Social Media)
सातारा, दि. ३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून मंगळवार (दि. ४ ऑगस्ट) रोजी ११ केव्ही शहापूर एक्स्प्रेस विद्युत वाहिनी आणि ३३ केव्ही शेंद्रे उपकेंद्रावर तातडीची दुरुस्ती (Rectification of Accident Spot) करण्यात येणार असल्याने शहापूर उद्भव योजनेचा वीजपुरवठा सुमारे ७ ते ८ तास बंद राहणार आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होणार असल्याची सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.
मंगळवारी दुपारच्या सत्रातील यशवंत गार्डन टाकीमार्फत होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती सातारा नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे शहापूर येथील पाणी उपसा केंद्रातून शहरातील वितरण टाक्यांमध्ये आवश्यक पाणी साठवता येणार नसल्याने नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे मंगळवारी यशवंत गार्डन परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा होणार नाही. दरम्यान, या दुरुस्तीच्या कामाचा परिणाम बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) सकाळच्या सत्रातील पाणीपुरवठ्यावरही होणार आहे.
शहापूर उद्भव योजनेवर अवलंबून असलेल्या गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी आणि बुधवार नाका टाकी या वितरण केंद्रांद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणे अथवा काही ठिकाणी पाणीपुरवठा न होण्याची शक्यता नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शहापूर उद्भव योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
Satara News: कराडतून मोठा एल्गार! शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष आणखी तीव्र






