पुणे शहरात घरफोडी घटना वाढल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे (फोटो - istock)
पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरामध्ये चोरी, ड्रग्जमाफिया अशा अनेक घटना समोर येत आहेत. शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेगाव, विश्रांतवाडी, बाणेर तसेच समर्थ परिसरात बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील एकाच इमारतीतील तीन फ्लॅट फोडण्यात आले आहेत.
याप्रकरणी आंबेगाव पोलिसांत आमोद परांजपे (वय वर्षे 43) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास घडली. तक्रारदार साईदत्त निवास टेल्को कॉलनीत तक्रारदार राहतात. परांजपे कुटुंबिय 08 एप्रिल रोजी रात्री घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ते नऊ एप्रिलला सकाळी परतले. त्यावेळी घरफोडीचा प्रकार समोर आला. त्यांनी घरात तपासणी केली असता. 65 हजार रुपयांची रोकड आणि एक लाख 61 हजार रुपये किमतींचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, याच इमारतीतीत अन्य दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. त्यातील एक फ्लॅटधारक ऑस्ट्रेलियात होते. त्यांच्या घराचा दरवाजा काहींना उघडा दिसल्याने आत पाहिल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील समर्थ कॉलनीत ज्येष्ठ नागरिकाचे घर फोडले आहे. तिथून 8 हजार रुपये व चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना घडली. बाणेर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. ज्येष्ठ नागरिक धार्मिक कार्यासाठी त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्या वेळी हा प्रकार घडला. विश्रांतवाडी येथील मोर्य गार्डनजवळील यशश्री अपार्टमेंटमध्येही घरफोडी झाली. येथून चांदीचे दागिने व रोकड असा 57 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
नाना पेठेतील चंदन सुपर मार्केट हे दुकान चोरट्यांनी फोडल्याचे गुरूवारी समोर आले. याप्रकरणी समर्थ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. याबाबत 51 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. समोर सुपर मार्केट व पाठिमागे घर असे हे दुकान आणि घर एकत्रित आहे. चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेशकरून 9 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे शहरात पादचारी महिला व ज्येष्ठ महिलांना लक्ष करून त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकावणाऱ्या तसेच बतावणीने त्यांच्याकडील दागिने लांबविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. सलग दोन दिवसात शहरात ८ घटना घडल्या असून, या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांना आवर घालण्यात पोलीस अपयशी पडत आहेत. गुरूवारी वेगवेगळ्या दोन घटनेत ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. रविवार पेठ व सदाशिव पेठेत घटना घडल्या. याप्रकरणी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.