माजी आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल (फोटो- istockphoto)
१. शिरूरमध्ये माजी आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल
२. कर्ज कर्जदाराला न देता संगनमताने अपहार केल्याचा आरोप
३. पोलिसांनी दाखल केला गुन्हा
शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर गहाण ठेवून मंजूर झालेले कर्ज कर्जदाराला न देता संगनमताने अपहार केल्याप्रकरणी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन बाळासाहेब गरुड (रा. गणेगाव दुमाला ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव दुमाला येथील सचिन बाळासाहेब गरुड यांनी व्यवसाय विस्तारासाठी २०१९ मध्ये अजित मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड येथे कर्जासाठी अर्ज केला होता. या संस्थांनी त्यांची शेतीजमीन गहाण ठेवून आवश्यक कागदपत्रे घेतली. दरम्यान, वेळोवेळी टाळाटाळ करत असताना दोन्ही संस्थांकडून एकूण ६५ लाखांचे कर्ज मंजूर करून जमिनीवर बोजा टाकण्यात आला. मात्र, मंजूर झालेले कर्ज कर्जदाराला न देता संबंधित संस्थांचे संस्थापक, संचालक व व्यवस्थापक यांनी संगनमताने ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचा आरोप आहे.
जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर फसवणुकीचा उलगडा
२०२३ मध्ये कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर गरुड यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिरुर पोलिसांना संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत.
तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अॅपचा पासवर्ड विसरला
पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय तरुणासोबत घडली. तेथील तीन महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून त्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता घडली. फिर्यादी तरुण एका इमारतीत गेला आणि तमन्ना शाहरुख मुलांना (वय ३२, रा. दत्तवाडी) हिच्याशी व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करायचे होते, मात्र पासवर्ड विसरल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून वाद झाला आणि मारहाण झाली.