सोमाटणे टोलनाक्यावर सराईत गुन्हेगारांकडून थेट पोलिसांवर गोळीबार करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : सोमाटणे फाटा–तळेगाव परिसरात घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणामुळे तळेगाव आणि सोमाटणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा परिसरात गुरुवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. युनिट क्रमांक २ च्या पथकाने दरोडेखोरांच्या वाहनाचा पाठलाग करत असताना आरोपींकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
युनिट 2 पथकाने संशयित दरोडेखोरांच्या एमएच 14 – जेई 2628 या क्रमांकाच्या वाहनाचा पाठलाग केला. आरोपींनी अचानक पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी दक्षता दाखवत तात्काळ प्रत्युत्तर दिले आणि तिघा दरोडेखोरांना घटनास्थळीच ताब्यात घेतले. या कारवाईत दोन पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे आणि दरोडेखोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही घटना सोमाटणे टोल नाक्याजवळील लडकप पेट्रोल पंपाजवळ घडली. दिवसा ढवळ्या झालेल्या या थरारक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2, स्थानिक पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पंचनामा करून परिसर सील करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या तीन सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू असून, त्यांच्या अन्य गुन्ह्यांचा तपासही वेगाने करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अंजली दमानिया आणि अजित पवारांमध्ये पेटलं वाकयुद्ध? पुणे जमीन घोटाळा थेट जाणार हायकोर्टात
वडगाव मावळमध्ये बिबट्याचा वावर
मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात बिबट्याची दहशत कायम असताना, काल रात्री शिकार शोधत फिरत असलेला बिबट्या ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे आणि धाडसी भूमिकेमुळे परत पळाला. प्रगतशील शेतकरी दिलीप राक्षे आणि गावातील काही तरुणांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन बिबट्याला हुसकावून लावण्यात यश मिळवले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा शेताजवळ हालचाल ऐकू आली तसेच कुत्र्यांच्या सलग भुंकण्यामुळे संशय निर्माण झाला. तपासणीसाठी गेलेल्या तरुणांना अंधारात बिबट्याचे स्पष्ट दर्शन झाले. लगेचच दिलीप राक्षे यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना सतर्क केले आणि सर्वांनी मिळून आवाज, टॉर्चचा प्रकाश आणि साधनांचा उपयोग करून बिबट्याला परत जंगल भागाकडे हुसकावले.
या प्रसंगानंतर गावात भीती आणि सावधगिरीचे वातावरण आणखीनच वाढले आहे. बिबट्याचा वावर सतत असल्यामुळे रात्री गावातील हालचाल लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. शेतकरी जनावरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत. बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये स्पष्ट भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.






