जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी (फोटो -istockphoto)
जळगाव: ईमेलद्वारे जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतच्या धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डंपरच्या मदतीने आयुष प्रसाद यांची हत्या करण्यात येईल असा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी भ्रष्ट असून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेला ईमेल हा जळगाव जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठवण्यात आला आहे. पोलिस या ईमेलचा खोलात जाऊन तपास करत आहेत. या प्रकरणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलिस अधीक्षक यांना सूचना देण्यात येतील व दोषींवर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
याआधी देखील पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांना अशा धमक्या आल्या आहेत. या घटनेत सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल करून मेल करणाऱ्याचा शोध घेतला जेल असे जळगाव पोलिस आधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
भाजप नेते शाहनवाज हुसेन यांना जीवे मारण्याची धमकी
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक, 2025 हे सादर करण्यात आले होते. या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी राज्यसभेतही हे वक्फ विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली. दरम्यान आता यावरूनच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री शाहनवाज हुसेन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थ दिल्याप्रकरणी शाहनवाज हुसेन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
वक्फ सुधारणा विधेयक ही मुस्लिम समाजाच्या हिताचे असल्याचे शाहनवाज हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मला सोशल मिडियावर सारख्या धमक्या मिळत आहेत. मात्र मी घाबरणार नाही. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था माझ्यासोबत आहे. हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचे आहे. विरोधक विनाकारण भ्रम पसरवत आहेत. याआधी देखील शाहीन बाग सारख्या ठिकाणी आंदोलन केले गेले. ती विरोधकांची राजनीती होती.