संग्रहित फोटो
सायबर फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी रेडिओ, फोन, सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन चॅनेलवर रात्रंदिवस प्रचार केला जात असला तरी, देशात सायबर फसवणुकीचे प्रकार थांबत नाहीत. अलिकडेच अर्थ मंत्रालयाने राज्यसभेत सादर केलेल्या सायबर फसवणुकीच्या आकडेवारीनुसार गेल्या १० महिन्यात म्हणजे एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत फसवणुकीच्या २४ लाख घटना नोंदविल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी लोकांकडून ४२४५ कोटी रूपये लुटले आहेत.
जर आपण या दृष्टिकोनातून पाहिले तर, गृहमंत्रालयाकडून सायबर फसवणुकीविरूद्ध युद्धपातळीवर जागरूकता मोहीम राबविली जात असूनही, सायबर घोटाळेबाजांचे मनोबल उंचावलेले आहे, त्यामुळे इतकी प्रसिद्धी होऊनही डिजीटल फसवणुकीचे प्रकार पूर्णपणे थांबलेले दिसून येत नाहीत. या घटना थोड्यासुद्धा कमी झालेल्या नाहीत, उलट त्या सतत वाढत आहेत. २०२२-२३ या संपूर्ण वर्षात सायबर फसवणुकीच्या एकूण २० लाख घटनांची नोंद झाली होती, तर २०२३-२४ मध्ये या घटनांची संख्या वाढून ती २८ लाख झालेली आहे. २०२२-२३ मध्ये एकूण २५३७ कोटी रूपयांची फसवणूक झाली होती, तर २०२३-२४ मध्ये फसवणुकीचा आकडा ४४०३ कोटी रूपयांवर पोहचला आहे. यावर्षी १० महिने उलटले आहेत आणि गुन्हेगारांनी केलेली फसवणूक ४२४५ कोटी रूपयांवर पोहचली आहे. जी २०२२-२३ च्या तुलनेत ६७ टक्के जास्त आहे. यावरून असा अंदाज लावता येतो की, गृह मंत्रालयाने अलिकडेच स्थापन केलेल्या सायबर सेलच्या कारवाया होऊनही गुन्हेगारांना भीती वाटत नाही.
डिजीटल पेमेंट फसवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सेंट्रल पेमेंट्स फ्रॉड इन्फॉर्मेशन रजिस्ट्री सुरू केली आहे. येथे तत्काळ तक्रार करून फसवणूक करणाऱ्यांना पैसे काढण्यापासून रोखणे हा त्याचा उद्देश आहे. आतापर्यंत या प्रयत्नातून बँकिंग नेटवर्कने १३ लाख तक्रारींवर त्वरित कारवाई करून ४३८६ कोटी रूपये वाचविले आहेत. यावरून असा अंदाज लावता येतो की, पोलिस, तपास संस्था आणि बँकांच्या संयुक्त दक्षतेनंतरही फसवणूक करणाऱ्यांचा कहर खूपच जास्त असल्याचे सिद्ध होत आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँक ‘म्यूल हंटर डॉट एआय’ या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विशेष साधनांची मदत घेत आहे. हे सर्व असूनही गुन्हेगारांचे मनोबल इतके उंचावले आहे की, ते सर्वांनाच मागे टाकत आहे. गेल्या काही महिन्यात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युपीआय व्यवहाराची सुरक्षा अनेक पातळ्यावर वाढविली आहे. कारण फसवणुकीच्या घटना कमी होण्याऐवजी सतत वाढत आहेत.
नवीन युक्त्यांचा वापर
परिस्थिती तर अशी आहे की, गेल्या एक वर्षात सायबर गुंडांनी त्यांच्या फसवणुकीच्या पद्धतीमध्ये हजारांपेक्षा अधिक नवीन पद्धती वापरल्या आहेत. यावरून सायबर गुन्हेगार किती निर्भयपणे त्यांच्या कारवाया करीत आहेत याची कल्पना करता येऊ शकते. आता प्रश्न असा आहे की, हे सर्व प्रयत्न करूनही सायबर फसवणुकीच्या घटना थांबण्याऐवजी का वाढत आहेत? खरं तर बँकिंग व्यवस्थेतील त्रुटीव्यतिरिक्त कितीतरी जास्त डिजिटल बैंकिंग सुविधा वापरणारे लोक वारंवार इशारे आणि स्पष्टीकरण देऊनही निष्काळजीपणापासून ते परावृत होत नाहीत.
डिजिटल अटकेच्या प्रकरणात मोठी वाढ
विविध अहवाल आणि डिजिटल अंदाज असे सूचित करतात की, अजूनही ऑनलाईन बँकिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराचा वापर करणारे ५० टक्क्यापेक्षा जास्त लोक फसवणूक होण्याच्या भीतीपासून मुक्त आहेत, त्यांना यासंबंधी काही जाणून घेण्याची किंवा समजून घेण्याची आवश्यकता सुद्धा वाटत नाही. रात्रंदिवस डिजिटल व्यवहार करणारे अनेक लोक ऑनलाईन सुरक्षेबाबत खूपच निष्काळजी असतात आणि सर्वकाही माहित असूनही फसवणुकीचे बळी ठरतात. मागील काही वर्षात या संदर्भात हजारो मार्गाने लोकांना सावध करण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न केले गेले आहेत. बहुतेक वेळा, लोक त्यांच्या फोनवर कॉल येण्यापूर्वीच त्रासदायक संदेश वारंवार ऐकतात, तथापि, सत्य असे आहे की, बहुतेक लोक ते एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने ते काढून टाकतात.
सतर्क राहण्याची गरज
फसवणूक करण्याचे तंत्र वारंवार बदलून ते पोलिस आणि तपास संस्थांना मुर्ख बनविण्यात यशस्वी होत आहेत. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे जेथे आपल्या देशातील लोक इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल जीवनशैली जगतात, तेथे बहुतेक लोकांची डिजिटल साक्षरता ५० टक्केही नाही. साधारणपणे आपल्या देशातील लोकांना काहीही शिकण्याची सवयच नसते आणि डिजिटल साक्षरतेच्या बाबतीतही लोकांनी अशीच उदासीन वृती स्वीकारलेली आहे, त्यामुळे लोकांना या सर्व गोष्टींबद्दल थोडेही सावध राहण्याची गरज वाटत नाही. आपल्या देशात दर तासाला ३३० लोक, दर मिनिटाला सुमारे ५.५ लोक आणि दर ११ सेकंदाला कोणी ना कोणी डिजिटल फसवणुकीचे बळी पडत आहेत.