संग्रहित फोटो
पुणे : अमली पदार्थ विरोधी विभागाकडून (एनसीबी) कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी भारती विद्यापीठ परिसरातील एका तरुणाची २० लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण कात्रज भागात राहायला आहे. चोरट्यांनी त्याला २९ ऑक्टोबर रोजी फोनवर संपर्क साधला. तसेच अमली पदार्थ विक्री प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-एनसीबी) कारवाई होणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी त्याच्याकडे केली. नंतर तरुणाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाने बँक खात्यात वेळोवेळी २० लाख ९० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यनंतर चोरट्यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. चौकशीत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : वडिलांकडून चारचाकी गाडी आण, नाहीतर…; पतीने केला पत्नीचा छळ
गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलेसह दोघांची २९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाषाण भागातील महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी ओैंध भागातील एकाची नऊ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली.
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तन्मय रमेश जाधव (रा. ओैंदुबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात ६१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांची एका परिचितामार्फत तन्मय जाधवशी ओळख झाली होती.
बिल्डराविरोधात फसवणुकीची तक्रार
महिन्याला दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक अमित लुंकड यांच्यासह इतरांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत ही तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अमित कांतीला लुंकड, अमोल कांतीलाल लुंकड आणि पुष्पा कांतीलाल लुंकड यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. याबाबत प्रविणचंद जैन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे.