बालविवाह करणं तरूणाला भोवलं; आख्ख्या कुटुंबावरच गुन्हा झाला दाखल (File Photo : Child Marriage)
शिक्रापूर : हिवरे कुंभार (ता.शिरुर) येथे ऑक्टोबर 2023 मध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याची घटना घडली. यामध्ये अल्पवयीन मुलीने नुकतेच एका बाळाला जन्म दिल्याने सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह सासू-सासरे व पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी चंद्रभागा सोपान लोंढे, सतीश सोपान लोंढे, धनश्री सतीश लोंढे, सुनीता छबू शेलार, छबू महादेव शेलार, सोनाली विशाल पंचरस व रवी छबू शेलार या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. हिवरे कुंभार (ता.शिरुर) येथील चंद्रभागा लोंढे या महिलेने तिच्या 16 वर्षीय मुलीचा बालविवाह श्रीगोंदा तालुक्यातील सुप्रिया शेलार यांच्या रवी शेलार या मुलाशी 2023 मध्ये करून दिला होता. त्यानंतर युवती श्रीगोंदा येथे पतीच्या घरी राहत होती. नुकतेच या तरूणीने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिल्याने तरुणी अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने ससून रुग्णालयाने शिक्रापूर पोलिसांना कळवले.
पोलीस उपनिरीक्षक विजय चौधरी, विशाल देशमुख, महिला पोलीस हवलदार नीता चव्हाण, पूजा सावंत यांनी ससून रुग्णालयात जात पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला. तेव्हा मुलीच्या आई-वडिलांनी व सासू-सासऱ्यांनी संगनमत करुन तरुण-तरूणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही ऑक्टोबर २०२३ मध्ये हिवरे कुंभार येथे बालविवाह केल्याचे समोर आले.
याबाबत महिला पोलीस हवालदार निता रामदास चव्हाण (वय ३२, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी पीडित युवतीच्या कुटुंबातील चंद्रभागा सोपान लोंढे, भाऊ सतीश सोपान लोंढे, भावजय धनश्री सतीश लोंढे (सर्व रा. हिवरे कुंभार ता. शिरुर जि. पुणे) यांच्यासह पीडितेचे पती रवी छबु शेलार, सासू सुनिता छबु शेलार, सासरे छबु महादेव शेलार, नणंद सोनाली विशाल पंचरस (सर्व रा. बेलवंडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध बालविवाहसह आदी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.