'दृश्यम' स्टाईल हत्या; पतीचा खून करून मृतदेह 12 फूट खोल खड्ड्यात पुरला (File Photo)
जामनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामध्ये विवाहबाह्य संबंधानंतर पतीकडून पत्नीची किंवा पत्नीकडून पतीची हत्या केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता दोन वर्षांपूर्वी पतीचा खून करून त्याचा मृतदेह औद्योगिक शेडमधील काँक्रीटच्या फरशीखाली सुमारे १२ फूट खोल पुरल्याचा आरोप पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि त्यांच्या साथीदारावर आहे.
गुजरातच्या जामनगरमध्ये ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी गुरुवारी उत्खनन करून मृताचा सांगाडा बाहेर काढला. मृत जिग्नेश गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता होता. पत्नी पृथ्वी उर्फ भूमीबेन कुटुंबीयांना तो कामासाठी ऑस्ट्रेलियाला गेल्याचे सांगत होती. मात्र, जिग्नेशच्या चुलत भावाने ऑस्ट्रेलियातील संपर्क तपशील मागितल्यानंतर तिच्या कथेत विसंगती आढळली. त्यानंतर कुटुंबीयांनी २६ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीत पत्नीने कथितरित्या गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ मे २०२४ रोजी पार्टीच्या बहाण्याने जिग्नेशला डारेड जीआयडीसीतील शेडमध्ये बोलावून त्याच्या दारूमध्ये सायनाइड मिसळण्यात आले. मृत्यूनंतर आरोपींनी १२ फूट खोल खड्डा खोदून मृतदेह पुरला आणि त्यावर काँक्रीटचा थर टाकला. या प्रकरणी पृथ्वी उर्फ भूमीबेन, कथित प्रियकर निलेश कचटिया आणि बलवीर वर्मा यांना खून, पुरावा नष्ट करणे आदी आरोपांखाली अटक करण्यात आली.
जेवण वाढण्याच्या वादातून महिलेची हत्या
बिहारच्या जहानाबादमध्ये एक दीर महिलेसाठी राक्षस बनला आणि त्याने किरकोळ कारणावरुन आपल्या वहिनीचा खून केला. हत्येमागचे कारण फार धक्कादायक असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जहानाबाद जिल्ह्यातील पारसबिघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैनपुरा इमादपूर गावात सदर घटना घडून आली. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दीराने धारदार शस्त्राने त्याच्या वहिनीचा गळा चिरुन तिची निर्घृण हत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार, नराधम मेहुणा कुणाल कुमार वगळता घरातील इतर सदस्य भात पेरणीसाठी शेतात गेले होते आणि घटनेवळी फक्त दिर आणि त्याची वहिनी घरी उपस्थित होते.






