सौजन्य - नवराष्ट्र टीम
पंढरपूर : उंबरगाव (ता. पंढरपूर) येथे एका व्यक्तीने गांजाची शेती केली होती. याची माहिती मिळताच पंढरपूर शहर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या धाड टाकून संबंधित व्यक्तीकडून २ लाख ६३ हजार ४२७ रुपये किमतीचा २६ किलो ११६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी राजेंद्र कालिदास पवार (रा. उंबरगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी आपल्या वहिवाटीत व कब्जेत असलेल्या शेतजमीन गट नंबर १८६ मध्ये बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित असलेल्या वरील वर्णनाचा २५ किलो ७६८ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे व ३४८ ग्रॅम सुका गांजा असा एकूण २६ किलो ११६ ग्रॅम वजनाचा किंमत रुपये २ लाख ६३ हजार ४२७ रुपये किमतीचा मादक उग्र वासाचा प्रतिबंधित गांजा बेकायदेशीर अनधिकृतपणे लागवड केलेला गांजा मिळून आला.
हे सुद्धा वाचा : ‘त्या’ अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी
राजेंद्र पवार याच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरिक्षक भारत बिराप्पा वाघे यांनी सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे. अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अशिष कांबळे, शरद कदम, राजेश गोसावी, सुरज हेंबाडे, शहाजी मंडले, नीलेश कांबळे, सचिन हेंबाडे, सचिन इंगळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
२० लाखांचे अमली पदार्थ जप्त
पुणे शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. ड्रग्जमुक्त सिटीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू असून, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर करडी नजर ठेवली जात आहे. सिंहगड रोड भागात अमली पदार्थ विक्रीस आलेल्या उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर,घाटकोपर, मुंबई), पियूष शरद इंगळे (वय २२, रा. स्पाईन रोड, चिखली,पिंपरी- चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे व त्यांच्या पथकाने केली आहे.