संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : पोलीस ठाण्यात धूळखात पडलेली कागदपत्रे, एखाद्या कागदामुळे खोळंबलेला तपास किंवा अर्ध्यावर राहिलेला तपास, साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी व एका अधिकाऱ्याकडे डझनभर गुन्ह्यांचा तपास, यामुळे गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होतो अन् गुन्हे निकाली वेळेत होत नाहीत. शहर पोलीस दलातील हे चित्र मात्र, आता बदलत असून, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विशेष उपक्रम हाती घेऊन प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याबाबत प्रयत्न सुरू केले. परिणामी गेल्या एका वर्षात तब्बल साडे आकरा हजार गुन्हे निकाली निघाले असून, ३ वर्षात ३० हजार गुन्ह्यांची निकाली झाली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांवर असणारा तपासाचा बोजा कमी झाला आहे. निकालीचे लक्ष हे, झीरो पेंडसी करण्याचा पोलिसांचा विचार आहे.
पुण्याचा विस्तार वाढला तशी पुण्यातील गुन्हेगारीत झपाट्याने वाढ होत आहे. वर्षाला दहा हजारांवर दाखल होणारे गुन्हे गेल्या काही वर्षात आता १२ ते १३ हजारांच्या घरात गेले आहेत. तक्रार अर्ज व त्यातून आप-आपसात मिटणाऱ्या तक्रारी तर दाखलच न झालेल्या गुन्ह्यांची संख्या तरी पोलिसांचेही डोळे दिपवणारी आहे. पुण्याचा विस्तार, पोलीस ठाण्यांची संख्या व गुन्हे वाढत असले तरी पुणे पोलीस दलाला सातत्यात कमतरता भासतेय ती मनुष्यबळाची. ८० ते ८५ लाख नागरिककरण असलेल्या शहराची सेवा साडे नऊ हजार पोलीस करत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडतो. गुन्ह्यांची वाढ, वाढलेला व्हीआयपी बंदोबस्त, त्यासोबत सण-उत्सव, आंदोलनांचा बंदोबस्त व नंतर गुन्हे तपास आणि गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम पोलीस करत आहेत. परंतु, वाढलेल्या बंदोबस्त व इतर कामकाजामुळे पोलिसांच्या तपासावर परिणाम पडत असल्याचे वास्तव आहे. त्यातून गुन्ह्यांची संख्या वाढली जात असून, तपासावरील गुन्हे वाढत आहेत. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हे निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ निरीक्षक यांना गुन्हे निकाली काढण्यासाठी आदेश देऊन गुन्हे निकाली करण्यास सांगितले आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पुर्ण करून गुन्हे निकाली काढण्याची सूचना दिली आहे. हे करत असताना मात्र, गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम झाला नाही पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले आहे. त्यानूसार, गेल्या वर्षात (२०२४) तब्बल ११ हजार ६०३ गुन्हे निकाली काढले आहेत.
गेल्या वर्षी गुन्हेगारीत झाली वाढ; १२९९ गुन्हे जादा
गेल्या वर्षी म्हणजे, २०२४ मध्ये २०२३ च्या तुलनेत गुन्हेगारीत मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे. गुन्ह्यांची नोंद केली जात असल्याचा दावा पोलिसांचा असला तरी तब्बल वर्षात १२९९ गुन्हे २०२४ मध्ये वाढले आहेत. २०२३ मध्ये शहरात एकूण ११६५१ गुन्हे घडले (पोलिसांकडे दाखल) आहेत. तर, २०१४ मध्ये १२ हजार ९५० गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे गुन्हे शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाणे स्थरावर वाढले असली तरी पोलिसांना हे रोखण्याचे आवाहन असणार आहे. त्यामुळेच गुन्हेगारीत वाढ व कायदा- सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र असल्याचे प्रत्येकाला वाटते.