संग्रहित फोटो
पुणे : शिक्षणानिमित्त पुण्यात आल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला पोलीस भरती करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (आंबेगाव पोलीस ठाणे) तक्रार दिली आहे. त्यानूसार, राजू पंधारे (वय ४८, रा. भारती विद्यापीठ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा सैनिक कल्याण विभाग अशी संस्था चालविली जाते. या नोंदणीकृत संस्थेत राजू पंधारे हा क्लर्क म्हणून काम करत होता. याठिकाणी तरुणी पोलीस भरतीच्या तयारीसाठी जात होती. गेल्या चार वर्षापुर्वी त्यांची ओळख झाली होती. ओळखीनंतर राजू याने तरुणीला पोलीस दलात भरती करण्याचे आमिष दाखविले. पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. पोलीस भरतीबाबत विचारणा केली असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तिला मारहाण देखील केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रियांका गोरे तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, १८ वर्षीय तरुणावर गुन्हा नोंद केला आहे. आरोपी व पीडित मुलगी एकाच परिसरात राहण्यास आहेत. त्याने मुलीला धमकावून तिच्यावर नातेवाईकाच्या घरी नेहून अत्याचार केला. तिला धमकी देत मारहाण केली. घाबरलेल्या मुलीने याप्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. सहायक निरीक्षक प्रियांका देवकर अधिक तपास करत आहेत.
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.