संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरुर तालुक्यातील एक सरपंच तसेच एका सामाजिक कार्यकर्त्याला एका बंटी बबलीने आम्ही स्वच्छ भारत अभियान विभागात कामाला असून, आमदार खासदारांसोबत ओळख असल्याचे दाखवून गावच्या विकास कामांना निधी देण्याचे आमिष दाखवत तब्बल सत्तावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरुर पोलीस येथे येथे सुदर्शन म्हाळू उगले व सारिका सुदर्शन उगले या बंटी बबलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ भाकरे व त्यांचा मित्र अन्नापूर येथील वैभव झंजाड यांची गावातील विकास कामांच्या आढाव्यातून सुदर्शन उगले व सारिका उगले यांच्याशी ओळख झाली होती, त्यांनतर त्या दोघांनी आम्ही शासनाच्या स्वच्छ भारत अभियान विभागात वरिष्ठ पदावर कामाला आहे, आमची अनेक आमदार खासदारांसोबत चांगली ओळख असल्याचे सांगत आम्ही तुम्हाला गावच्या विकास कामांसाठी भरपूर निधी घेऊन देतो असे सांगून आम्हाला आधी काही रक्कम द्यावी लागेल, असे सांगत सरपंच सोमनाथ भाकरे यांच्याकडून पंधरा लाख तर वैभव झंजाड यांच्याकडून बारा लाख रुपये आरटीजिएस तसेच रोख स्वरुपात घेतले, मात्र त्यांनतर विकास कामांच्या निधी बाबत विचारणा केली असता दोघेही टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.
भाकरे व झंजाड यांनी त्या दोघांबाबत चौकशी केली असता ते दोघे शासनाच्या स्वच्छ भारत अभियान विभागात नसल्याचे समोर आल्याने आपली फसवणूक झाल्याचे दोघांच्या लक्षात आले, याबाबत टाकळी हाजीचे सरपंच सोमनाथ रसिक भाकरे (वय ३८ वर्षे रा. माळवाडी टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुदर्शन म्हाळू उगले व सारिका सुदर्शन उगले दोघे (रा. नांदूर शिंगोटे ता. नाशिक जि. नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.
कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा
कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.