संग्रहित फोटो
पुणे : घर फोडणाऱ्या चोरट्यांनी ‘कमाल’च केली असून, बंद घरे, दुकाने अन् गोडाऊन फोडत असतानाच चक्क मार्केटयार्ड परिसरात पार्क केलेल्या तीन रिक्षांचे चाके काढून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीसही चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चोरट्यांनी हडपसरमध्ये स्टुडिओ, तर विश्रांतवाडी, बाणेरमध्ये बंद घरे फोडली आहेत. सोबत कोंढव्यात एक मेडिकल फोडल्याचे गुरूवारी दाखल गुन्ह्यांतून उघडकीस आले आहे. याप्रकरणात मात्र, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अद्याप घटनेची नोंद नाही. तक्रार देण्यास कोणी न आल्याने नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. घरफोड्यांसोबत, चेन स्नॅचिंग तसेच रस्त्यात अडवून लुबाडले जात आहे. अशातच चोरट्यांनी कमाल करत मार्केटयार्ड भागातून पार्किंगमध्ये उभा केलेल्या ३ रिक्षांची चाकेच चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. आता प्रकरणात नेमके गुन्हा दाखल होतो का, आणि पोलीस चाके चोर चोरट्याला पकडतात का, हे पहावे लागणार आहे. परंतु, पोलिसांकडून किरकोळ म्हणून दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वाढण्यास कारण ठरत असल्याचे दिसत आहे.
हडपसरमध्ये चोरट्यांनी फोटो स्टुडिओच्या दरवाज्याचे कुलूप तोडून ३ लाख ७७ हजार रुपयांचा कॅमेरा, मोबाइल तसेच अन्य साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे. हिंगणे मळा भागात चोरी झाली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत रोहीत तोडकर (वय ३७) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांचा हिंगणे मळा येथे फोटो स्टुडिओ आहे. मंगळवारी मध्यरात्री स्टुडिओचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी स्टुडिओतील कॅमेरा, मोबाइल, तसेच अन्य साहित्य चोरुन नेले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील पथकाने येथे धाव घेऊन पाहणी केली. अधिक तपास उपनिरीक्षक विलास सुतार करत आहेत.
ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी
कोंढव्यातील मेडिकलचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी २४ हजारांची रोकड चोरुन नेली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुणाचे कोंढवा बुद्रुक गावठाणात मेडिकल आहे. मेडिकल बंद असताना चोरट्यांनी येथे चोरी केली. गल्ल्यातील २४ हजारांची रोकड चोरुन नेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
घरफोडीत चार लाखांचा ऐवज चोरी
विश्रांतवाडी आणि बाणेर परिसरात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडत रोकड व इतर ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदारांचे आळंदी रस्त्यावरील कळस येथे घर आहे. ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी घर फोडून २ लाख ८८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. पाषाण-सूस रस्त्यावरील बाणेरमध्ये चोरट्यांनी सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप उचकटून ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत बाणेर पोलिसांत ३६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.