मध्यपूर्वेतील युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका; सरासरी 1051 रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर (संग्रहित फोटो)
लासलगाव : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून, दर कोसळले आहेत. देशात कांदा दर ठरवणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार कांद्याला सरासरी १०५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
मध्यपूर्व (खाडी देश) भागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा भारतातील कांदा बाजारावर थेट परिणाम दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय मागणीत घट आणि निर्यातीत झालेली मोठी घसरण यामुळे देशातील घाऊक बाजारात कांद्याचे दर खाली आले. एप्रिल २५ ते जानेवारी २०२६ पर्यंत देशातून १२ लाख ८३ हजार ४७३ मे टन कांदा निर्यात होऊन २९७० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
युद्धामुळे आखाती देशांकडे जाणारी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. परिणामी, निर्यात मंदावल्याने देशातील बाजारपेठेत कांद्याचा साठा वाढला आहे आणि घाऊक बाजारात दर घसरले आहेत. अनेक ठिकाणी घाऊक दर उत्पादन खचपिक्षा कमी झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. काही ठिकाणी कांदा अत्यल्प दरात विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. नगदी पीक असल्याने सगळे अर्थचक्र विस्कळीत झाले आहे.
उत्पादक संकटात
दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होत नाही. अनेक ठिकाणी कांदा कमी दरात विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काही उपाययोजना करणे गरजेचे
निर्यातदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनेची मागणी एचपीइएचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी स्पष्ट केले. केंद्राने समन्वय साधून निर्यात धोरण स्थिर करणे, निर्यात प्रोत्साहन दर वाढवणे, किमान ७ टक्के वाहतूक अनुदान देणे, आधुनिक साठवण सुविधा उभारणे आणि बंदर व लॉजिस्टिक व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. किरकोळ बाजारात दर तुलनेने स्थिर असले तरी दरातील घसरण चिंताजनक ठरत आहे. परिस्थिती सुधारली नाही तर कांदा उत्पादकांना आणखी आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे सरकारकडून खरेदी किंवा निर्यात प्रोत्साहनासारख्या उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.
निर्यात घटली; साठा वाढला
खाडी देशांमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे भारतातून होणारी कांद्याची निर्यात कमी झाली आहे. परिणामी, जे कांदे बाहेर जाणार होते ते देशांतर्गत बाजारातच राहिल्याने पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बाजारातील संतुलन बिघडले असून, दर कोसळले आहेत. घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. अनेक ठिकाणी दर उत्पादन खर्चाच्या खाली गेले आहेत. त्यामुळे शेत कऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे आणि आर्थिक संकट तीव्र झाले आहे.






